दरोडा टाकुन खंडणी मागणा-या आरोपींच्या नंदुरबार पोलीसांनी आवळल्या मुसक्या
नंदुरबार : दरोडा टाकुन खंडणी मागणा-या आरोपींच्या नंदुरबार पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे.
विजय फत्तेचंद्र अग्रवाल (वय-३३ रा. खांडबारा ता. नवापूर जि. नंदुरबार) हे अन्न धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. दि. २३ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८.०० वाजेचे सुमारास ट्रक क्र. T.S- 15 UD- 3943 मधुन त्यांचे चालक व क्लिनर हे गुजरातमध्ये धान्य जात होते. खांडबारा गावापासून अंदाजे १५ ते २० कि.मी. अंतरावर नवापूर ते नंदुरबार रोडवर शिवन नदीजवळील पेट्रोलपंपाजवळ १० ते १२ लोकांनी त्यांचा ट्रक अडवून ट्रकमधील माल बेकायदेशीर आहे असे सांगितले. तसेच ट्रक चालक व क्लिनर यांना त्या लोकांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या खिशातील १८ हजार रुपये व त्यांचे मोबाईल काढ़ुन घेतले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील वाहन हे वाहन चालक तसेच क्लिनरसह अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. तसेच तक्रारदारास चालकाच्या फोनवरुन फोन करून सदर गाडी तसेच चालक व क्लिनर यांना सोडविण्यासाठी पाच लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली.
तक्रारदार हे पैशाची जुळवाजुळव करीत असतांना सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोना राजेंद्र काटके यांना समजली. सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांना सदरचा प्रकार सांगितला.
सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असल्याने तसेच नंदुरबार जिल्ह्यातील व्यापा-यांची अशा प्रकारे लुटमार झाल्याने त्यांचेमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सदरचा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेऊन नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाख़ाली स्थानिक गुन्हे शाख़ेचे पोनि/ रविंद्र कळमकर , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोनि/ किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोनि/ राहुलकुमार पवार यांचे नेतृत्वाखाली ०३ पथके तयार केली. तसेच संपुर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आली.
आरोपी हे गाडी चालकाच्या मोबाईलवरुन फिर्यादी यांचेशी वारंवार फोनद्वारे संपर्क साधुन पैशांची मागणी करीत होते. फिर्यादी हे आरोपीतांना पैसे देण्यासाठी आष्टा बस स्टँड जवळ आले असता पोलीसांनी अत्यंत नियोजनपुर्वक तेथे सापळा लावला होता. आरोपी हे सदर ठिकाणी पैसे घेण्यासाठी आले असता आरोपींना पोलीसांची चाहुल लागली. आरोपी सदर ठिकाणाहुन पळुन जात असतांना पोलीसानी त्यांचा पाठलाग करुन २ आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले.
सदर गाडीचे चालक व क्लिनर तसेच वाहन हे ताब्यात मिळणे ही पोलीसांची प्राथमिकता होती. पोलीसांनी पकडलेल्या आरोपींना नावे विचारली असता त्यांनी विशाल रणछोड गावीत (वय-२५ वर्षे रा. पातोंडा ता. जि. नंदुरबार) मनिष ऊर्फ बंन्टी भगवान महाले (वय -२७ वर्षे रा. आष्टा ता. जि. नंदुरबार) अशी सांगितली. त्यांचेकडे वाहन चालक व क्लिनर बाबत चौकशी केली असता त्यांनी पकडून ठेवलेले वाहन, चालक व क्लिनर हे मनिष महाले याचे शेतात लपवून ठेवले असल्याचे सांगितले. पोलीसांनी वेगवान सुत्रे हालवत मनिष महाले याचे शेतातुन वाहन चालक व क्लिनर यांना सुखरुपरित्या ताब्यात घेतले.
त्यानंतर पकडलेल्या आरोपींना पोलीस स्टेशनला आणून इतर आरोपींची नावे 1) सागर रतिलाल पाडवी, 2) मुन्ना सापित भिल (गावीत), 3) जयेश राजु वळवी, 4) विक्की दिनेश मोरे, 5) राजेंद्र ऊर्फ राजा जयिंसग शिंदे (मराठे), 6) नितेश वळवी, 7) भिमा उर्फ मनोज लोटन माळी, 8) बबल्या माळी, 9) बुधा रतन भिल व आरोपींचे इतर मित्र असे समजले. सदर बाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं 135/2022 भादवि कलम 395, 364 अ 387,341 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी नामे 1) सागर रतिलाल पाडवी 2) मुन्ना सापित भिल (गावीत ) 3) जयेश राजु वळवी 4) विक्की दिनेश मोरे 5) राजेंद्र ऊर्फ राजा जयिंसग शिंदे (मराठे) 6) नितेश वळवी 7) भिमा उर्फ मनोज लोटन माळी यांना देखील अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. तसेच उर्वरीत आरोपी व गुन्ह्यात निष्पन्न होणारे आणखी आरोपी यांना लवकरच अटक करण्यात येईल.
अटक केलेले सर्व आरोपी २२ ते २५ वयोगटातील असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत केवळ मौज मजा करण्यासाठी त्यांना या प्रकारचे गुन्हे करण्याची सवय लागल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. सदरचे आरोपी हे पोलीस कोठडीत असुन सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही व्यापा-यासोबत असा गैरप्रकार झाला असल्यास त्यांनी कोणतीही भिती न बाळगता तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी.
सदरची कामगिरी प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक सागर आहेर, स्थानिक गुन्हे शाख़ेचे पोना राजेंद्र काटके, दादाभाई मासुळ, पोलीस शिपाई मुकेश ठाकरे, सचिन सैंदाने, महेंद्र सोनवणे यांनी संयुक्तरित्या केली आहे.