जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनची फ्युचर फार्मिंग शेतीमधील नवदृष्टी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपालांनी जाणून घेतले जैनचे उच्च कृषितंत्रज्ञान

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य अव्दितिय असेच आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता कमी जागा, कमी पाण्यात चांगल्या गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन ही काळाची गरज ठरणार असून फ्युचर फार्मिंगमधील शेती नवीदृष्टी ठरू शकते अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फ्युचर फार्मिंग (भविष्यदर्शी शेती) या प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी दिली. जैन इरिगेशनचे शेतीमधील नवनवीन प्रयोग देशातील अधिकाधिक शेतकरी बांधवांना कळल्यास ते त्यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी भविष्यातील काळाची पाऊले ओळखून त्या दृष्टीने साकारलेल्या उच्च तंत्रज्ञान, फ्युचर फार्मिंग, माती विरहीत शेती, सॉईललेस मीडिया, व्हर्टिकल फार्मिंग, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, पुदिना, खिरे काकड्या, हळद, आले, टोमॅटो, ब्रोकोली आदी प्रयोगांच्या ठिकाणी राज्यपाल्यांनी भेट देऊन मोठ्याउत्सुकतेने माहिती जाणून घेतली. शेतीतील या प्रयोगांमुळे जैन इरिगेशनने जणू कृषि विश्वाची निर्मिती केली आहे.

राज्यपालांनी फ्युचर फार्मिंग लॅबमध्ये एरोपोनिक बटाटा या प्रयोगाची माहिती घेतली. या प्रयोगात भविष्याची अन्नाची वाढती गरज आणि नवतंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ एरोपोनिक्स बटाटा प्रयोगात आहे. नैसर्गिक संसाधने सिमीत असतील व त्याउलट लोकसंख्या वाढलेली असेल त्या संसाधनांमध्ये अन्न धान्याच्या उत्पादनाला मर्यादा येणार आहे. आपण जमिनी, पाणी व अन्य निसर्गदत्त घटक वाढवू शकत नाही परंतु एरोपोनिक्स बटाटा यासारख्या नवतंत्राचा पुरेपूर उपयोग करून भविष्यात चांगला पर्याय उभा करू शकतो असे राज्यपाल जैनचे उच्च कृषितंत्रज्ञान समजावून घेताना म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जैन हिल्स येथील दौऱ्यात कंपनीच्या कॉर्पोरेट प्रोफाईलीची माहिती देणाऱ्या परिश्रम भवनास भेट दिली. यासह जैन हिल्स परिसरातील अत्यंत निसर्गरम्य अशा ‘भाऊंची सृष्टी’ या भाऊंच्या स्मृतिस्थळास भेट दिली. श्रद्धेय भवरलालजी जैन हयात असताना त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्थळात ते रमले. भाऊंच्या सृष्टी येथे असलेल्या वाटिकेत त्यांच्याहस्ते आंबा रोपेचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन तसेच काही निवडक वरिष्ठ सहकारी देखील यावेळी उपस्थित होते. या भेटी दरम्यानच्या प्रवासात त्यांनी विविध फळांच्या लागवड क्षेत्रांचीही पाहणी केली. ज्या परिसरात वॉटर युनिव्हसिटी उभारली जाणार आहे तो परिसर त्याची संकल्पना समजून घेतली. याबरोबरच जगातील सर्वात मोठ्या टिश्युकल्चर उत्पादन केंद्र म्हणून नावारुपास आलेल्या केळीच्या टिश्युकल्चर लॅब आणि प्रायमरी हार्डनिंग प्रकल्पास भेट दिली. या लॅबमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांची निर्मीती व थेट शेतकऱ्यांपर्यंत हे उच्च तंत्रज्ञान कसे पोहोचते याची माहिती त्यांनी जाणून घेतली.

या प्रवासात त्यांनी भविष्यातील शेती (फ्युचर अॅग्रिकल्चर) येथे व्हर्टिकल फार्मिंग, मातीविना शेती, हायड्रोपोनिक्स शेती या सह भविष्यातील शेती याबाबतच्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. या उच्च कृषी जैवतंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी बायोटेक्नॉलॉजी लॅबचीही आवर्जून भेट घेतली. त्याबाबतची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. अनिल पाटील, के. बी. पाटील यांनी करून दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे