शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात स्वयं सिद्धा अभियाना अंतर्गत जुडो प्रशिक्षण
शिंदखेडा : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी कल्याण विभाग आणि एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं सिद्धा अभियाना अंतर्गत जुडो प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन शिंदखेडा महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यशाळेची सुरुवात उद्घाटन समारंभाने करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन हेमंत कुलकर्णी, (प्रशिक्षक) यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी धुळे येथील जुडो प्रशिक्षक हेमंत कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी संजय जमदाडे, तसेच वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. तुषाए पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. ए. पाटील, डॉ. भुगोल विभाग प्रमुख विशाल पवार, गणित विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सचिन जाधव, प्रा. स्वप्निल गांगुर्डे, शा. शि. संचालक प्रा. राहुल पाटील, प्रा. वंदना पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील होते.

कार्यशाळेच्या प्रास्तविकात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन जाधव यांनी कार्यशाळा आयोजनाचा विद्यापीठाचा आणि महाविद्यालयाचा उद्देश तसेच कार्यशाळेचे स्वरूप याबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. तुषार पाटील यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी विद्यापीठाकडुन राबविण्यात येणा-या विविध योजना आणि त्यांचे विद्यार्थ्यांना होत असलेले फायदे याबद्दल माहिती दिली. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्यांनी सर्व विद्यार्थीनींना आत्म-संरक्षण आजच्या काळाची गरज असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या भाषणातून पटवून दिली. सर्व विद्यार्थीनींना एन. एस. एस., एन. सी. सी., क्रीडा, जुडो कराटे सारख्या क्षेत्रात सहभागी होण्याची गरज असल्याची माहिती देताना नवनवीन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी सूत्रसंचालन प्रा. वंदना पाटील यांनी केले.

उदघाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर धुळे येथील हेमंत कुलकर्णी, संजय जमदाडे, कु. प्रेरणा जगताप (धुळे) आणि कु. वैष्णवी खेडकर (धुळे) यांनी सर्व विद्यार्थीनींना जुडो चे प्रशिक्षण सकाळी ९.३० ते ११.३० दोन तास दिले. त्यानंतर दररोज सकाळी ९ ते ११ असे दोन तास प्रमाणे सर्व ५० विद्यार्थीनींना सलग ८ दिवस हे प्रशिक्षण चालू राहिले. हेमंत कुलकर्णी, संजय जमदाडे, कु. प्रेरणा जगताप (धुळे) आणि कु. वैष्णवी खेडकर (धुळे) यांनी रोज जुडो प्रशिक्षणामध्ये नवनवीन गोष्टी, विविध प्रकाराचे संरक्षणात्मक पवित्रा तसेच विविध पंच विद्यार्थीनींना सादर करून आणि त्यांच्या कडून प्रात्यक्षिक देखिल करून घेतल्या. प्रशिक्षणासाठी असलेल्या मॅट वर मुलींनी जुडोचे विविध पैलु करून पाहिले. या प्रशिक्षणाचा सर्व विद्यार्थिनींनी भरपूर लाभ घेतला.

दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी अगोदर २ तास हेमंत कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांनी जुडो प्रशिक्षणाचा वर्ग घेतला. त्यानंतर या कार्यशाळेचा समारोप शिंदखेडा महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील याच्या अध्यक्षतेखाली पार पडला. समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पाटील यांनी जुडो प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व सर्व विद्यार्थीनींना त्यांच्या भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्या. तसेच ज्या कार्यशाळांमधुन विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा विकास होत असेल अशा सर्व कार्यशाळेंसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे समारोप प्रसंगी काही मुलींनी आपले मनोगत मांडले त्यात त्यांनी जुडो मध्ये नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाविद्यालयाचे तसेच आयोजकांचे आभार मांडले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थीनींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. समारोप प्रसंगी सुत्रसंचालन प्रा. वंदना पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन जाधव यांनी मांडले. कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीत गायनाने करण्यात आला.



