शेतकऱ्यांचे शेती साहित्य चोरीला
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील तीन शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य शेतातूनच चोरीला गेल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मोड, बोरद, मोहिदा, कळमसरे शिवारात शेतीचे साहित्य चोरीला जाणे हे नित्याचे झाले आहे. बोरद रस्त्यावर भाईदास पाडवी यांची पाच एकर शेती आहे. त्यावर पपई व मिरची लागवड केली होती. त्यासाठी एक लाखाचे ठिबक सिंचनाचे साहित्य खरेदी केले होते. आता पुढील हंगामाचे पीक घेण्यासाठी शेतीची मशागत सुरू केली होती. त्यामुळे शेतातील ठिबक नळ्या व पाईप गोळा करून शेताच्या बांधावर ठेवले होते. एक दोन दिवसात शेतीची मशागत झाली की ते ठिबक शेतात पसरविणार होते. परंतु त्याआधीच चोरट्यांनी रात्रीच्या वेळी त्यावर डल्ला मारला. त्याचप्रमाणे कळमसरे शिवारातील अरविंद मोहन पाटील यांच्या शेतात देखील रात्रीच्या वेळी तीन एकरातील ठिबक सिंचनाच्या नळ्या चोरून नेल्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. केळी लागवड करण्यासाठी वीस एम एम साधारण पन्नास हजाराच्या ठिबक नळ्या असून त्या चोरून नेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच उखा नारायण पाटील यांच्या शेतातून फिल्टर चोरीला गेले आहे. सदरील चोरी एका व्यक्तीने केली नसून गँगच सक्रिय झाली आहे. यावरून असे दिसते की चोरांकडे मोठे वाहन देखील आहे.