श्री. संत सेना महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा
भराडी येथील संत सेना महाराज मंदिरासमोर सामाजिक सभागृहासाठी 25 लाख रुपयांचा निधी देणार : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड : भराडी येथील श्री संत सेना महाराज मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधकामासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेतून 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भराडी ता. सिल्लोड येथील संत सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी केली.
येत्या 3 महिन्यात प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून या सभागृहाच्या कामाला सुरुवात होईल. येत्या वर्षी मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. भराडी ता. सिल्लोड येथे श्री. संत शिरोमणी सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त जीवन चरित्र कथा व पंचदिनी कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार ( दि.28 ) रोजी देवगोपाल महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश महंत ओंकारगिरी महाराज, शेलगाव संस्थानचे महंत दयानंद महाराज, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, पं. स. सभापती डॉ. संजय जामकर, उपसभापती काकासाहेब राकडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, परभणी येथील लाच लुचपत विभागाचे किरण बिडवे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, राज्य वारकरी संघटनेचे कृष्णा लहाने, सिल्लोड सहकारी जिनिंग प्रेसिंगचे व्हाईस चेअरमन अनिस पठाण, पं. स. चे माजी उपसभापती अजीज बागवान, भराडीचे सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन , माजी पं. स. सदस्य दत्तात्रय सोनवणे, विष्णू काळे, शिवा गौर, नानासाहेब रहाटे, कल्याण डवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या वतीने राज्यातील पुरातन मंदिरांचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आतापर्यंत सर्वाधिक मंदिरांचे जीर्णोद्धार होत असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. हरिनाम सप्ताह व कीर्तन सोहळ्या सारख्या धार्मिक कार्यक्रमातुन सकारात्मक ऊर्जा मिळते. हरिनाम सप्ताह व कीर्तन सोहळा म्हणजे शांतीचे केंद्र असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
मंदिराचे विश्वस्त बाबुराव बिडवे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत सत्कार करून आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास भविकभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सूत्र संचलन रायभान जाधव यांनी केले.



