शिंदखेडा तालुका शिवसेनेची संघटनात्मक पुर्नबांधणीची शिवसेना कार्यालयात बैठक संपन्न
ग्रामीण भागात शिवसेनेच्या संघटनात्मक पुर्नबांधणीस सुरुवात; नवीन चेहऱ्यांना मिळेल संधी
शिंदखेडा (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागात शिवसेनेच्या संघटनात्मक पुर्नबांधणीस सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार शिंदखेडा तालुका शिवसेनेची संघटनात्मक पुर्नबांधणीची बैठक शिंदखेडा येथील शिवसेना कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी व शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत सुरुवातीस शिवसेना जिल्हा समन्वयकपदी डॉ.भरत राजपुत यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच बळसाणे येथील पं.स.सदस्य महावीर जैन व खर्दे येथील पं.स.सदस्य दिपक पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी म्हणाले की, कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षापासून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे संघटनेस मरगळ आली होती. ती झटकून आता नव्याने गांवनिहाय शाखाप्रमुख, गटप्रमुख, वार्डप्रमुख, समन्वयक, सोशल मिडीया प्रमुख, महिला शाखा संघटिका, वैद्यकीय कक्षप्रमुख आदी प्रमुख पदांवर नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. तसेच गावागावात-प्रभागात जाऊन शिवसेनेचे विचार पोहचवून संघटनात्मक बांधणी करावी, असे सांगितले.
यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके बोलतांना म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, बाजार समितीच्या निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर प्रत्येक गट व गणात संघटनेची बांधणी करावी लागेल. त्यासाठी बदल करावे लागतील. प्रत्येक गावात प्रभागप्रमुख, प्रभाग संघटक, प्रभाग समन्वयक, संघटिका, सोशल मिडीया प्रमुखांची नेमणुक करावयाची आहे. अशी पक्षाची पुर्नबांधणी करायची असून त्याची जबाबदारी जि.प.गट प्रमुखांची असेल. गट प्रमुखांनी प्रत्येक गावात जाऊन २० तारखेपर्यंत नावे द्यायची आहेत. यासाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह निवडणुका लढविलेले आजी-माजी सदस्य यांना बरोबर घ्यावयाचे आहे. पक्ष कार्यालयाकडून त्या नावांची छाननी होऊन शिक्कामोर्तब केली जाईल. त्यानंतर नियुक्त्या जाहीर करण्यात येईल. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात शिवसेनेप्रती लोकांचा विश्वास वाढला असून त्याचा निवडणुकीवेळी नक्कीच फायदा होईल, असेही साळुंके म्हणाले.
याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक डॉ.भरत राजपुत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा कृ.उ.बा.समितीचे सर्जेराव पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, विधानसभा संघटक गणेश परेदशी, माजी जि.प.सदस्य छोटू पाटील, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, महिला आघाडीच्या तालुका संघटीका ज्योती पाटील, एस.टी.कामगार सेनेचे आर.आर.पाटील, दिनेश बच्छाव, दिनेश पाटील, राजु पाटील, चंद्रसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.



