धक्कादायक! गेल्या ७ वर्षांत आठ लाखांहून अधिक भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं !
नवी दिल्ली (प्रतिनिधी) अनेक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये भारताची गणना जगातील उत्तम देशांमध्ये करण्यात आली आहे, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या ७ वर्षात साडे आठ लाखांहून अधिक लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ८,८१,२५४ नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यापूर्वी १ डिसेंबर रोजी संसदेत सांगितले होते की, गेल्या ७ वर्षांत २० सप्टेंबरपर्यंत ८,०८,१६२ भारतीयांनी नागरिकत्व सोडले होते. त्यापैकी १,११,२८७ नागरिकांनी यावर्षी २० सप्टेंबरपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे. याचबरोबर, २०१६ ते २०२० दरम्यान १०,६२५ परदेशी नागरिकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. यामध्ये सर्वाधिक ७७८२ पाकिस्तानचे आणि ७९५ अफगाणिस्तानातील नागरिकांचा समावेश होता, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले होते.
दरम्यान, सध्या जवळपास १ कोटी भारतीय नागरिक परदेशात राहत आहेत. भारतीय नागरिकत्वाशी संबंधित हा डेटा अशा वेळी आला आहे, ज्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे की देशव्यापी राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, केंद्र सरकारने म्हटले आहे की, जे लोक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या कक्षेत येतात ते सर्व लोक भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात.
नागरिकत्व सुधारणा कायदा १० जानेवारी २०२० पासून अस्तित्वात आला आहे. CAA आणि NRC संदर्भात देशभरात निदर्शने झाली. निदर्शनांमुळे, फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीच्या काही भागात दंगली झाल्या होत्या. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या कायद्याला घटनाबाह्य ठरवत विरोध केला होता.