महाराष्ट्र

नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ चा प्रश्न सोडवण्याचा उद्योगमंत्री ना.देसाईच्या अधिकाऱ्यांना सूचना

शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांचा पाठपुरावा; लवकरच समिती शेतकऱ्यांशी चर्चा करणार

शिंदखेडा (प्रतिनिधी) येथील नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ चा प्रश्न लवकरच कायमचा सुटण्याचा मार्गावर असुन याबाबत उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ बाबत एक नवीन समिती नेमण्याची व शिष्ट मंडळाची भेट घेवून चर्चा करण्याचा तसेच पिकाखालील जमिनी वगळण्याचा सूचना संबंधित औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्याकडे २०१६ पासून सातत्याने पाठपुरावा चालु ठेवला होता. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.


सविस्तर वृत्तानुसार, शिंदखेडा येथील नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ च्या प्रश्नाबाबत बुधवार दि. १५ रोजी मुंबई येथे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके उपस्थित होते. यावेळी बोलतांना साळुंके म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात नरडाणा ग्रोथ सेंटर या नावाने औद्योगिक वसाहत निर्माण झालेली आहे. त्यापैकी टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ अंतर्गत जमिनीचे वाटप झालेले असुन तुरळक प्रमाणात उद्योग देखील सुरु आहेत. टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ मध्ये ३५५ हेक्टर जमिन संपादित झाली असून त्यापैकी ३५ टक्के जमिनीवर प्रत्यक्षात उद्योग सुरु आहेत. ६० टक्के भुखंड अजुनही बखळ आहेत.

असे असतांना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने टप्पा-३ मध्ये नरडाणा औद्योगिक क्षेत्राला लागून नरडाणा, माळीच, गोराणे व वाघोदे परिसरातील काळी, कसदार, सुपिक व बागायती ६५३ हेक्टर जमीन संपादित करण्याबाबत सन २०१०-११ मध्ये अधिसूचना काढली. शेतकऱ्यांच्या जमिनींवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शिक्के मारण्यात आले व ते आजपर्यंत कायम आहेत. गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनीचा मोबदलाही मिळत नाही व सातबाऱ्यावरील शिक्केही काढले जात नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना जमिनी विकता ही येत नाही व बँका कर्ज ही देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. परंतु शेतकऱ्यांसोबतच्या वाटाघाटी फिस्कटल्या. सदर परिसरात शेतजमिनीचे भाव साधारणत: एकरी २० लक्ष रुपयांपर्यंत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा हेक्टरी ५० लक्षपर्यंत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदलाही मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. शासनाकडे याबाबतीत वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील यातून मार्ग निघत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे, अशा भावना मंत्री महोदयांकडे साळुंके यांनी व्यक्त केल्या.

याबाबत उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ बाबत अधिकाऱ्यांनी एक नवीन समिती नेमावी. त्या समितीने नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ ला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. तसेच या संदर्भात तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करावी. चर्चेअंती शेतकऱ्यांना एकतर जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अथवा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील महामंडळाचे शिक्के काढून टाकण्याचा सूचना उद्योगमंत्री ना.देसाई यांनी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार लवकरच औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एक समिती नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा-३ येथे प्रत्यक्ष भेट देणार असून शेतकऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे