नंदुरबारच्या विकासाच्या बाता मारणाऱ्या नेत्यांच्या फसव्या विकासाला भुलू नका : खासदार डॉ. हीना गावित
साक्री (प्रतिनिधी) नंदुरबारच्या विकासाच्या बाता मारणाऱ्या नेत्यांच्या फसव्या विकासाला भुलू नका. त्यांनी जिथे जिथे पैसा आणला किंवा दिला त्या-त्या विकासकामांना त्यांची जहागिरी समजत स्वतःसह कुटुंबीयांची नावे देत एककल्ली कारभार केला जात असल्याचा आरोप लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी केला. येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील सुभाष चौकात झालेल्या सभेत खासदार डॉ. गावित बोलत होत्या.
खासदार डॉ. गावित म्हणाल्या, की लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघातून आपण सलग दोन वेळा प्रचंड बहुमताने निवडून दिले. या दोन्ही निवडणुकांत साक्री शहराने, शहरातील मतदारांनी प्रचंड आशीर्वाद दिला. पाच वर्षांपूर्वी येथील ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. यानंतर साक्री शहराचा विकास व्हावा यासाठी अनेक नवनवीन योजना साक्रीच्या नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, येथील नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची विकासकामे केली नाहीत आणि आपल्यालाही करू दिली नाहीत. येथील सत्ताधाऱ्यांना शहराचा विकासच करायचा नसल्याने त्यांनी अनेक योजनांमध्ये खोडा घालण्याचेच काम केले. माझे वडील आमदार डॉ. विजयकुमार गावित आदिवासी विकासमंत्री असताना सात कोटी रुपये निधीतून नंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नाट्यमंदिर उभे राहिले. यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा एक रुपयाचाही संबंध नाही. त्यांचा जिथे पैसा असतो, जिथे ते निधी देतात त्या कामाला ते स्वतःचे नाव देतात. जसे साक्री शहरात चंद्रकांत मंगल कार्यालय उभारले. नंदुरबारला व्यापारी संकुल उभारले. त्याला त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले. त्यांनी नंदुरबारचे छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर उभारले असते, तर त्यालाही त्यांनी चंद्रकांत किंवा बटेसिंह रघुवंशी नाट्यमंदिर असे नाव दिले असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले नसते, हे असे खोटे बोलणारे नेते आहेत.
जीही विकासकामे झाली मग ती पाणी योजना असेल, नाट्यमंदिर असेल, ती विकासकामे आमदार डॉ. गावित यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व गटातील नगरपालिकांसाठी अमृत योजना सुरू केली. या योजनेत नंदुरबार पालिकेचा समावेश व्हावा म्हणून आपण खासदार या नात्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे पाठपुरावा करत नंदुरबार पालिकेत आमची सत्ता नसतानाही माँ-बेटी गार्डनसाठी निधी आणला आणि आज हे माँ-बेटी गार्डन उभे राहिले आहे. मात्र, श्री. रघुवंशी स्वतः या कामांचे श्रेय घेऊन, साक्री शहरात अशा विकासकामांची स्वप्ने दाखवून तुमची फसवणूक करत आहेत. ते म्हणतात ना, हम किसी का उधार नही रखते. मग उद्या होणाऱ्या त्यांच्या सभेत मतदार म्हणून तुम्ही त्यांना याबाबत प्रश्न नकी विचारा.
यावेळी सभेला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, पक्षाचे निवडणूक प्रभारी अनुप अग्रवाल, सहप्रभारी बापू खलाणे, जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे, भाऊसाहेब देसले, अरुण धोबी, नंदुरबारचे नगरसेवक अॅड. चारुदत्त गाळणकर, शैलेंद्र आजगे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते, अॅड. गजेंद्र भोसले, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गिते, विजय ठाकरे, पिंपळनेर मंडळाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, विजय भोसले, निलेश क्षीरसागर यांच्यासह भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, निवडणुकीतील सर्व १७ उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.