प्रा. आशिष गुजराथी यांना पीएच. डी. प्रदान
चोपडा (विश्वास वाडे) येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील उपप्राचार्य सहाय्यक प्रा. आशिष सुभाषलाल गुजराथी यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे त्यांनी केलेल्या संशोधन कार्याबद्दल पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
७३ व्या घटना दुरुस्तीनंतर पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसभांचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. ग्राम विकासामध्ये ग्रामसभांची भूमिका निर्णायक असून त्या माध्यमातून ग्रामीण भागात गरजांवर आधारित विकासकामे केली जात आहेत. यासंदर्भातील प्रा. आशिष गुजराथी यांच्या ‘ग्रामविकासात ग्रामसभांची भूमिका’ या विषयावरील संशोधन प्रबंधास विद्यापीठाच्या तज्ञ समितीने मान्यता देऊन पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. प्रा. डॉ. विनोद रायपूरे हे त्यांचे संशोधन मार्गदर्शक होते.
प्रा. गुजराथी हे समाजकार्य महाविद्यालयात गेल्या २३ वर्षांपासून अध्यापन करीत आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमात ते सक्रिय असून संस्थेचे समन्वयक म्हणून देखील काम पहात आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्यासह समाजातील विविध स्तरातील व्यक्तींकडून अभिनंदन होत आहे.