अहिराणी भाषेत प्रचंड सामर्थ्य अहिराणी साहित्यिकांमुळेच अहिराणी भाषा जगाच्या नकाशावर जिवंत : डॉ. श्रीपाल सबनीस
धुळे (करण ठाकरे) छत्रपती शिवरायांच्या महान इतिहासाचे अनेक विद्वानांनी विकृतीकरण करून जातीजातीचे वाद निर्माण करण्याचे काम केले आहे. यापुढे हिंदू-मुस्लीम असे कोणतेही वाद आम्हाला नको आहेत. भांडायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यात आणू नका. महाराजांचे स्वराज्य हे सर्व जाती-धर्मांचे एकसंघ स्वराज्य निर्माण करणारे होते. अहिराणी भाषेमध्ये प्रचंड सामर्थ्य सामावले आहे. अहिराणी साहित्यामुळे खानदेशात अहिराणी भाषा जगाच्या नकाशावर आजही जिवंत ठेवण्याचे काम अहिराणी साहित्यिकांनी केलेली आहे, आणि हा समृद्ध वारसा अहिराणी साहित्यिकामुळेच जिवंत असल्याचे गौरवोद्वार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अहिराणी पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी धुळ्यात केले.
तर धुळ्यात खानदेश साहित्य संघाला अहिराणी भाषेच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी उपस्थित अहिराणी साहित्यिकांना सांगितले. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत केले जात आहेत. एस. एस. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथील प्राध्यापक, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांच्या भौगोलिक संकल्पनांसोबत मानवी मनाच्या भावविश्वाची गुंफण करणारा भौगोलिक काव्यसंग्रह वसुंधरा, अभीर लोकसमूहाची ऐतिहासिक स्थित्यंतरे, अहिराणी भाषेचे प्रकार व भावसौंदर्य तथा खान्देशातील लोकसंस्कृती याचे अस्सल अहिराणी भाषेतून यथार्थ दर्शन घडविणारा लेखसंग्रह अहिरानीन्या पाऊलखुना, बळीराजाचं जीवन अर्थपूर्ण मांडणारा अहिराणी भाषेतील काव्यसंग्रह घर वावर आणि माणसाला माणुसकीचे यथार्थ दर्शन घडविणारा मराठी काव्यसंग्रह माणूस जाळण्याच्या अटीवर या चार पुस्तकांचे आज दि. १५ जानेवारी रोजी धुळ्यातील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयात प्रकाशन केले.
८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील हे होते. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, खानदेशाचा आणि अहिराणी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तो अभिमान प्रत्येकाला वाटणे वाटणे स्वाभाविक आहे. अहिराणी साहित्याचा वारसा खानदेशातील सर्व साहित्यिक समर्थपणे पुढे नेण्याचे काम करीत आहेत. देशात अनेक बोली भाषा लुप्त पावत चाललेल्या आहेत मात्र अहिराणी साहित्यकांमुळे आपली बोलीभाषा कधीही लोप पावणार नाही यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले.