‘विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी सजगता निर्माण व्हायला पाहिजे’ : डॉ. नामदेव शिंदे
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने डॉ. नामदेव शिंदे (सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक, सोलापूर) यांचे ‘मराठी भाषा: परंपरा व इतिहास’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे तसेच एम. टी. शिंदे आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी डॉ. नामदेव शिंदे ‘मराठी भाषा:परंपरा व इतिहास’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, ‘भारतीय राज्यघटनेत ज्या २२ अधिकृत भाषा आहेत त्यात मराठी भाषेचा उल्लेख आहे. आज महाराष्ट्राबाहेरील जवळपास १५ विद्यापीठांमध्ये मराठीचे अध्यापन व संशोधन केले जाते तसेच जगातील ७२ देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते ही महत्वपूर्ण बाब आहे.मराठी रोजगाराची व व्यवहाराची भाषा बनली पाहिजे. आपल्या मनातील भाषेविषयी असलेला न्यूनगंड काढून टाकले पाहिजेत. बालवयापासून मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे. भाषाव्यवहार लवचिक व्हायला हवा. मातृभाषेतून शिक्षण घ्यायला विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे या सर्व गोष्टी केल्या तरच मराठी भाषेचे संवर्धन व्हायला मदत होईल. त्याबरोबरच आजच्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी सजगता निर्माण करायला हवी.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी मराठीचा वापर व्यवहारात करून भाषिक कौशल्ये विकसित करायला हवी. मराठी भाषा ही नष्ट होणारी नसून ती सर्वसमावेशक आहे. मराठी भाषा आकलन सुलभ आहे. जी भाषा बदल स्वीकारते ती कधीही नष्ट होत नाही म्हणून मराठी बदल स्वीकारणारी भाषा आहे त्यामुळे तिचे अस्तित्व चिरंतन टिकून राहील यात शंका नाही.
या कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन डॉ. एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच बहुसंख्य विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.