निकुंभे येथे माहेरी असलेल्या महिलेला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील निकुंभे येथे माहेरी आलेल्या महिलेला तिच्या पुतण्याने फोन करून मुलांसह ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नंदुरबार जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या त्यांच्या पुतण्याविरुद्ध सोनगीर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
समाधान बोरसे असे पोलिसाचे नाव आहे. धुळे तालुक्यातील कापडणे येथील रहिवासी रंजना लोटन बोरसे (वय ३६) यांना तीन मुले आहे. कामानिमित्त त्यांचे पती मुंबईला गेले होते. त्यामुळे श्रीमती बोरसे या निकुंभे येथे माहेरी आल्या होत्या. या दरम्यान नंदुरबारला पोलिस दलात कार्यरत असलेला त्यांचा पुतण्या समाधान कृष्णा बोरसे (रा. चिंचवार, ता. धुळे) याने रंजना बोरसे यांना फोन केला. तू दिलेला अर्ज मागे घे अन्यथा तुला व तुझ्या तिघा मुलांना मारून टाकेल, असा दम त्याने दिला. दुपारच्या वेळी हा प्रकार घडला. त्यानंतर महिलेने वडील व भाऊ नवल पानपाटील व संदीप पानपाटील यांच्यासह सोनगीर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित समाधान बोरसे नंदुरबार पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सोनगीर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहे.