चोपडा महाविद्यालयात संपन्न झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात दि १६ फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून सीमा अर्जुन राव अहिरे (प्रांताधिकारी, अमळनेर) हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा) हे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आशाताई विजय पाटील (उपाध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा), डॉ. स्मिता संदीप पाटील (सचिव, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा) व प्रा.डी. बी. देशमुख (कार्यकारी सदस्य, महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी आणि पारितोषिक वितरण समितीचे प्रमुख के.एस. क्षीरसागर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयाची यशस्वी परंपरेचा आढावा सादर करून वर्षभरात महाविद्यालयाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सांगितली. यावेळी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन के.एस. क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमात जवळपास यशस्वी ८२ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रांताधिकारी सीमा अहिरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना दिशा मिळावी यासाठी सामाजिक जाणिवेचे भान असणे ही विद्यार्थी जीवनातील महत्वाची गरज आहे. सामाजिक दायित्वातून उतराई होण्यासाठी कार्य करावे. विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखूनच करीयरची संधी निवडावी. करिअरचं क्षेत्र निवडताना गुणवत्तेच्या आणि आवडीच्या आधारावरच ते क्षेत्र निवडावे, विद्यार्थ्यांनी तसे केले तर त्यांना यश नक्कीच मिळेल. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला मात करता आली पाहिजे, हे ज्याला जमलं तोच खरा विद्यार्थी. जीवनातील दुःख विसरून आपण पुढे गेले पाहिजे आणि आयुष्याला नेहमी सकारात्मक दृष्टीनेच बघावे. जीवनातील सारे दुःख विसरूनच आपण आयुष्यातील संघर्षाला जिंकू शकतो. विद्यार्थ्यांनी समाज कल्याणाच्या हेतूने प्रशासकीय क्षेत्रात उतरावे. ज्ञान उपासनेचा प्रभाव भविष्यावर पडतो.
याप्रसंगी ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ज्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली होती ते उद्दिष्ट आज पूर्ण होताना दिसते आहे.महाविद्यालयातील विद्यार्थी हे यशाच्या शिखरावर जाऊन पोचत आहेत. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांमध्ये यश संपादन करीत आहेत ही संस्थेच्या व महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम घेऊन यश संपादन करायला शिकले पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.पी.सपकाळे व सौ.एस. बी.पाटील यांनी केले तर आभार डी. डी. कर्दपवार यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.