महामार्गावर खड्डे चुकवताना कार उलटली ; 6 जण जखमी
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील गरताड शिवारात भरधाव ट्रक व कार समोरासमोर आली. या वेळी खड्डा चुकवताना कार रस्त्याच्या खाली उतरून उलटली. या अपघातात सहा जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी घडली. अपघातामुळे धुळे – चाळीसगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील वलवाडी परिसरातील रहिवासी चौधरी कुटुंबीय लग्नकार्यासाठी चाळीसगावला गेले होते. दुपारी ते शहराच्या दिशेने निघाले होते. गरताड शिवारातून जाताना त्यांच्या कारसमोर (एमएच – ०२ – सीपी- ९५९९) आयशर आला. तसेच रस्त्यात एक खड्डाही होता. खड्डा अन् आयशर चुकवताना कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले. त्यात नरेंद्र हरिचंद्र चौधरी (वय ४०), अरुण विष्णू चौधरी (वय ४५), मंगला निंबा चौधरी (वय ६०), अनिता सुनील चौधरी (वय ५०), सुनीता चंद्रकांत चौधरी (वय ५५), सीमा नरेंद्र चौधरी (वय ३८, सर्व. रा. वलवाडी) यांचा समावेश आहे. अपघातानंतर नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. तसेच पोलिस व १०८ रुग्णवाहिकेला कळवले. त्यानंतर सहा जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत रुग्णवाहिका मार्गस्थ झाली. त्यानंतर मोहाडी पोलिसांच्या पथकाने वाहतूक सुरळीत केली.