शिवसेना व ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची दखल ; प्रशासनाने तात्काळ बसवले गतिरोधक
अमळनेर (प्रतिनिधी) मंगरूळ येथील माध्यमिक शाळेजवळ दुभाजकावर झालेल्या अपघातांबाबत शिवसेना व ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गतिरोधक बसवले आहेत.
धुळे चोपडा राज्य मार्ग १५ वर मंगरूळ शाळेजवळ दुभाजकावर तब्बल ४२ अपघात झाल्यानन्तर नागरिक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. युवा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, शिवसैनिक अनंत निकम, भाजप युवा मोर्चाचे राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील, भटू घोलप, नाना पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. आंदोलन कर्त्यांनी तांत्रिक तृट्या लक्षात आणून दिल्यावरून अभियंता पाटील यांनी राज्य मार्ग १५ ची जबाबदारी असलेल्या धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून घटनेचे गांभीर्य ओळखत दुसऱ्याच दिवशी तीन ठिकाणी गतिरोधक टाकले. शाळेजवळ देखील गतिरोधक दोन्ही बाजूने टाकल्याने शालेय विद्यार्थी सुरक्षित रस्ता ओलांडू शकतील. यामुळे धुळ्याकडून येणाऱ्या वाहनांच्या वेगावर आपोआप नियंत्रण येऊन दुभाजकावर आदळणे थांबणार आहे. यापुढे वित्त हानी थांबणार आहे. ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाने, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी देखील या अपघात स्थळाबद्दल अहवाल वरिष्ठांकडे पाठवून उपाययोजनांची मागणी केली होती. गतिरोधकाचे काम सुरू असताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , उपनिरीक्षक नरसिंग वाघ, श्रीकांत पाटील, राकेश पाटील, कॉन्स्टेबल सुनील पाटील समक्ष हजर होते. युद्धपातळीवर गतिरोधकाचे काम झाल्याने गावकरी व प्रवाश्यानी आंदोलन कर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.