ढाणकी शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ; नागरिकांत भीतीचे वातावरण
पोलीस प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचे आवाहन
ढाणकी : ढाणकी शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यामुळे शहरातील नागरिक भयभीत झालले आहे. शहरातील काही भागात तर नागरिक रात्रभर जागून आपली रात्र काढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
ढाणकी शहर बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून सध्या ढाणकी शहराला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. भुरट्या चोऱ्या, दुचाकीच्या चोऱ्या यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. २ मे च्या रात्री सुद्धा टेम्भेश्वर नगर येथील अवधूत शामराव रावते यांच्या घरात दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. दरवाजाच्या आवाजामुळे अवधूत रावते यांच्या घरातील सदस्य खडबडून जागे झाले. तेव्हा घाबरलेल्या चोरांनी अवधूत रावते यांच्या परिवारावर दगडांनी हल्ला केला व घरात लग्नासाठी बचत म्हणून ठेवलेली एक लाख रुपयांची जमापुंजी व स्त्रियांच्या गळ्यातील सोन्याचा हार, मुलांच्या हातातील अंगठ्या व इतर दागिने असा अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज चोरटे पोलिसांच्या नाकावर टिचुन घेऊन पळून गेले असे नागरिकांचे म्हणणे आहे. दीपावलीच्या कालावधीमध्ये सुद्धा चोरट्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळेश्वर, करंजी, गांजे गाव इत्यादी गावात धुमाकूळ घातला होता. यावर सुद्धा पोलीस प्रशासन आळा घालू शकले नव्हते. मध्यंतरी शांततेचा काळ जाताच पुन्हा ढाणकी शहरांमध्ये आता चोरट्यानी धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. या होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान बिटरगाव पोलीस स्टेशन समोर असून ठाणेदार प्रताप बोस यावर आता कोणती उपाययोजना करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
पोलीस प्रशासनातर्फे नियमित गस्त ढाणकी शहरात सुरु असून आम्ही लवकरच चोरट्याच्या मुसक्या आवळू. गस्तीसाठी शहरात 17 ठिकाणी क्युआर कोड लावलेले असून आमचे कर्मचारी गस्तीसाठी त्या ठिकाणी गेले होते की नाही हे मला त्या क्युआर कोडं वरून कळते. तरी नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
प्रताप भोस
ठाणेदार, बिटरगाव पोलीस स्टेशन