न्याहळोद ग्रामस्थांचा वाळू लिलावास नकार
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील न्याहळोद येथील ग्रामस्थांनी पांझरा नदीपात्रातील वाळू लिलावास ग्रामसभेत एकमुखी नकार दिला. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील ग्रामस्थ नदीतील वाळू वाहण्यास मनाई करतात, यापुढेही पांझरा नदीपात्रातील वाळूचोरीला लगाम लावत नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहू, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. न्याहळोद येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सरपंच ज्योती भील, प्रांताधिकारी तहसीलदार तृप्ती धोडमिसे, गायत्री सैंदाणे, गटनेते विकास पवार उपस्थित होते.

न्याहळोद वारंवार वाळू ग्रामपंचायतीला लिलावासाठी प्रशासनाच्या वतीने पत्र व्यवहार सुरू होते. यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी धोडमिसे यांच्या समोर ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले. न्याहळोद येथील वाळूचा लिलाव केला तर नदीपात्रातून वाळू उपसा झाल्यावर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. पाण्याची पातळी कमी होईल व याचा फटका शेतकऱ्यांच्या विहिरींसह दहा गाव पाणीपुरवठा योजनेतील प्रमुख विहिरींना बसेल, उन्हाळ्यात बऱ्याचवेळा पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यात अजून वाळू उपसा केला तर मोठ्या प्रमाणावर जलपातळी घटणार आहे. म्हणून प्रशासनाने न्याहळोद गावातील वाळू लिलाव करू नये, अशी मागणी केली. यावेळी नदीतील अवैध वाळू उपसाबाबत दक्षता समितीने काळजी घ्यावी, ग्रामस्थांनी चोरटी वाहतूक करणाऱ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या एकमुखी मागणीमुळे वाळू लिलाव न होऊ देण्याचा ठराव करण्यात आला. या वेळी उपसरपंच रोहिदास कोळी, मंडळ अधिकारी सी. यू. पाटील, तलाठी सुजीत मोरे, पंचायत समिती सदस्य योगराज पवार, गटनेते विकास पवार, प्रभारी ग्रामसेवक विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य नामदेव रोकडे, परमेश्वर माळी, कल्पेश रायते, सुनील पवार, सुनील कढरे, प्रकाश वाघ, शिवनाथ वाघ, छोटू पवार, कैलास पाटील, पुंडलिक कोळी, संदीप रोकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



