चोपडा बसस्थानकाजवळ गांजा जप्त ; तस्करी करणाऱ्या तीन आरोपी ताब्यात
बारा किलो गांजासह तीन आरोपींना जेरबंद करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश
चोपडा (विश्वास वाडे) चोपडा बस स्थानकात एका टपरी जवळ बारा किलो गांजा सह तीन आरोपींना जेरबंद करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा बसस्थानकातील एका टपरीजवळ तीन इसम अवैधरित्या गांजा बाळगून आहेत .सदर इसमांची खात्री केली असता त्यांच्याजवळ तपकिरी रंगाच्या बॅगेत बारा किलो आठशे ग्रॅम वजनाचा सुमारे ६४००० रुपये किमतीच्या गांजा आढळून आला तसेच ६००० रुपये किमतीचे तीन मोबाईल आढळून आले व तपकिरी रंगाची बॅग आढळून आली, असा एकूण ७०२०० रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे.
सदर कारवाईत विक्की विनोद झंवर (वय २८ रा.गुजरवाडा भोकर ता. जि. जळगाव), मनवेल मार्टिन म्हस्के (वय ३३ रा. संजय गांधी नगर, ओ टी सेक्शन, रेल्वे स्टेशन जवळ,उल्हासनगर २ ठाणे), जितेंद्र रवींद्र महाजन (वय ३० रा. सानेगुरुजी नगर, स्टेशन रोड, उल्हासनगर ४ ठाणे) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पो.हे.कॉ.विलेश सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात भाग ६ सीसीटीएनएस ६२/ २०२२ एन डी पी एस १९८५ चे कलम ८, २० ,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत