नगाव येथे रंगली कुस्त्यांची दंगल माजी जि.प. अध्यक्ष भदाणे यांच्या हस्ते उद्घाटन
धुळे (करण ठाकरे) तालुक्यातील नगाव येथे बुधवारी कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्याहस्ते करण्यात आले.
दरवर्षी सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कुस्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सकाळी ९ वाजेपासून कुस्ती सामना रंगला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रामदास पाटील, नगाव येथील ज्येष्ठ ग्रामस्थ व तालुक्यासह जिल्ह्यातील मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कुस्त्यांसाठी जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील मल्ल आले होते. कुस्तींचा सामना पहाण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष मनोहर भदाणे म्हणाले, कुस्तीचा हा खेळ आरोग्य निरामय ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. मल्लांनी कुस्तीचानियमित सराव करावा, असे मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच या मातीतील खेळाचे प्रबोधन करून याची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही केले.
कार्यक्रमास नगाव येथील आबा बंडू पाटील, डॉ. अयुब पिंजारी, मनोहर रामदास पाटील, गोकुळ पाटील, रविंद्र देवचंद पाटील परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्ती स्पर्धेत विविध ठिकाणाहून आलेल्या मल्लांच्या कौशल्यपूर्ण डावांमुळे रंगत आणली. कुस्तींच्या कार्यक्रमाचे आयोजन नगाव येथील पिंटू कोळी, रविंद्र ठेकेदार, प्रविण भगवान पाटील, हरी पुना कोळी, एकनाथ दिनकर पाटील, दादा कोळी, प्रकाश भटू कोळी, पिंटू ठाकूर, उमेश कोळी, जगदिश शिवदास पाटील, महेश गुलाब पाटील यांनी केले होते. तर पंच म्हणून गोकुळ पाटील व गटलू पाटील यांनी काम पाहिले.