‘सिल्लोड-सोयगाव’ चा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढा ; राज्यमंत्री सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली बैठक
सोयगाव (विवेक महाजन) सिल्लोड-सोयगाव तालुक्यांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी पाण्याचा प्रश्न कायमचा सोडण्याचे निर्देश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. सोमवारी दुपारी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय जयस्वाल, औरंगाबादचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटने, पाणीपुरवठा विभागाचे अजय कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मंत्रालयातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
खडकपूर्णा किंवा नाथसागर आतून पाणी द्या!
सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी एक तर खडकपूर्णा नाहीतर पैठणच्या नाथसागर प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी यावेळी राज्यमंत्री सत्तार यांनी केली. शिवाय सोयगावच्या वाडी प्रकल्पाची उंची वाढवली तर थोड्या प्रमाणात का होईना प्रश्न सुटेल. तसेच निजामकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती केली तर काही गावांना दिलासा मिळेल. बारामती च्या धर्तीवर साठवण प्रकल्प किंवा साठवण बंधारे बांधले तरी अनेक गावांना त्याचा फायदा होईल असे यावेळी राज्यमंत्री सत्तार यांनी सुचवले.
महिनाभरात पुन्हा होणार बैठक
पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले. तसेच यासंदर्भात महिनाभरानंतर पुन्हा बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे आश्वासनही त्यांनी बैठकीदरम्यान दिले.
दोन्ही तालुक्यांच्या नकाशाचे केले अवलोकन
बैठकीनंतर राज्यमंत्री सत्तार यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांनी सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांच्या नकाशाचे अवलोकन केले. त्यानंतर यावर ठोस उपाय काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल अशी आशा
सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील जनतेच्या पाण्याची तहान कायमस्वरूपी मिटवण्याचा माझा मानस आहे. दोन्ही तालुक्यातील नागरिकांना वर्षभर पाणी मिळावे हा माझा उद्देश आहे. आजच्या बैठकीनंतर पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल अशी आशा आहे, असं महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.