धुळे व साक्री तालुक्यात गारपीट ; वादळामुळे पिकांचे नुकसान
धुळे (स्वप्नील मराठे) जिल्ह्यात धुळे व साक्री तालुक्यात सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सुमारे पाच मिनिटे गारपीट झाली. त्याआधी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील न्याहळोद परिसरात वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
न्याहळोद येथे पाऊस
न्याहळोद परिसरात सोमवारी सायंकाळी अर्धा तास बेमोसमी पाऊस झाला. परिसरातील कौठळ, जापी, बिलाडी गावांना पावसाने झोडपले. रब्बी पिकात गहू, हरभरा, कांदा हे पिके काढणीस पक्व झाली आहेत. येत्या १५ दिवसात हंगाम हाती येणार असताना अचानक पावसाने पिके पडली आहेत. यामुळे पीक काढणीस खर्च जास्त येणार आहे. गहू, हरभरा या धान्याचा रंग जाणार आहे.
परिसरात हलक्या सरी
बेटावद : सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्यास सुरवात झाली. बेटावद येथे सोमवारी दुपारपासून वातावरणात उनसावली बदल होऊन सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरींचे आगमन झाले. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले कारण आता हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाताना दिसत आहे.
साक्री तालुक्यातील वसमार येथे झालेली गारपीट
शिरधाने प्र. नेर ता. जि. धुळे येथे अवकाळी पावसासह गारपिटीने ने नुकसान झाले. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास २० मिनिटे गारपीट झाली. नुकसान प्रचंड झाले असून पंचनामा केल्यानंतरच परिस्थिती समोर येणार आहे. वसमारला गारपीट म्हसदी साक्री तालुक्यातील म्हसदी आणि वसमार परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसामुळे धांदल उडाली. वसमार शिवारात तर गारांसह पाऊस झाला. या भागात बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाह खंडीत झाला होता.
निमगुळला पाऊस
निमगुळ शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ परिसरात दमदार पाऊस झाला. अनेकांची धांदल उडाली. शेती पिकांचे नुकसान झाले.