सगरोळीच्या प्राथमिक शाळेला आली इंग्रजी झळाळी !
जागतिक महिला दिनी माता पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांचे इंग्रजी सादरीकरण
नांदेड (प्रतिनिधी) “आपल्या गावातच आता उत्तम कृतीयुक्त इंग्रजी शिक्षणाचा दर्जा असताना का म्हणून आमची मुले आम्ही बाहेर गावच्या इंग्रजी शाळेत पाठवावी. मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणास नवीन शैक्षणिक धोरणातून कला, क्रीडा, छंद आदींचे विशेष तासिकेद्वारे स्वंतत्र वेळेत मार्गदर्शन केले जाते. हे सर्व मुलांनी मांडलेल्या प्रदर्शनातून पाहून खूपच समाधान वाटले”. असं रोहिणी इंगळे, माता पालक म्हणाल्या.
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या प्राथमिक व हायस्कूल विभागातर्फे संयुक्त माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजन माता पालकांनीच केले होते. यावेळी अल्पशिक्षित असूनही आपल्या पाल्यास उच्च पदस्थ बनवणाऱ्या मातांचा सत्कार करण्यात आला. मुलांनी इंग्रजीतून केलेले गायन, भाषण, नाट्य, अभिनय यातून त्यांना दिले जाणाऱ्या ज्ञानाचे सादरीकरण करून उपस्थितांच्या उत्फुर्त टाळ्या मिळविल्या. कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी मुलांच्या हस्तकला, चित्रकला, विज्ञान साहित्य प्रदर्शन पाहून आनंद व्यक्त केला.



