महिला दिनानिमित्ताने आर्वी, गोंदूरच्या कुस्तीपटू दंगलगर्लचा अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते सन्मान
धुळे (करण ठाकरे) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आर्वी आणि गोंदूरच्या कुस्तीपटू असलेल्या दंगल गर्लचा अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन या दोन्ही दंगलगर्लने कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. दरम्यान विविध क्षेत्राबरोबर प्रत्येक मैदानी खेळात महिलांनी सक्षमपणे सहभाग घेऊन आपला नावलौकिक वाढवावा असे आवाहन अश्विनीताई पाटील यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यावतीने अश्विनीताई कुणाल पाटील यांनी आर्वी येथील कुस्तीपटू दंगल गर्ल कु. भाग्यश्री श्रावण मासुळे हीची प्रत्यक्ष भेट घेऊन सन्मान केला. यावेळी ग्रामीण भागात कुस्ती क्षेत्रात आपले नैपुण्य दाखविणाऱ्या भाग्यश्रीला प्रोत्साहन मिळावे म्हणून अश्विनीताई पाटील यांनी मनमोकळ्या गप्पाही केल्या. इ. ८ वी मध्ये शिकत असतांना भाग्यश्री मासुळे हीने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता, तरआर्वी परिसरात होणाऱ्या मल्लांना धोबीपछाड देत चितपट केले आहे. भाग्यश्रीचे वडील श्रावण मासुळे हे स्वतः पैलवान असल्याने वडिलांकडून तिला कुस्तीबाबत मार्गदर्शन मिळाले आहे.
दरम्यान गोंदूर ता. धुळे येथील हर्षदा मनोहर पाटील या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून दि. १७व १८ मार्च रोजी हरियाणा येथे ही स्पर्धा होणार आहे. या कुस्तीपटू विद्यार्थिनीचाही अश्विनीताई पाटील यांनी महिला दिनानिमित्ताने सन्मान केला हर्षदा पाटील हिलालहानपणापासूनच कुस्तीचे आकर्षण होते, एरंडोल येथील मामांकडून तिला कुस्तीचे बाळकडू मिळाले तर जयहिंद महाविद्यालयात शिकणाऱ्या हर्षदाला पवन चौधरी यांच्याकडून प्रशिक्षण मिळत आहे. कुस्ती स्पर्धेसाठी तिला वडील मनोहर साहेबराव पाटील व आईचे नेहमीच प्रोत्साहन मिळत आले आहे. पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत असतांना कुस्तीतही महिला आपला पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान वाटतो. असे मत अश्विनीताई कुणाल पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी या दोनही दंगलगर्ल कुस्तीपटूंचे अभिनंदन व कौतुक केले.