पंकज महाविद्यालयात डॉ. संजय पाटील यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ.संजय पाटील यांच्या सुशासन आणि व्यवस्थापन या अथर्व पब्लिकेशन्स जळगाव द्वारा प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पंकज महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. यावेळी आयोजित प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी मा. दादासाहेब डॉ. सुरेश बोरोले यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ.संजय पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या राज्यशास्त्र विषयाच्या टी.वाय.बी.ए. अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे लेखन केल्याबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब डॉ. सुरेश बोरोले तसेच उपाध्यक्ष अविनाश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच सदर पुस्तक हे टी.वाय.बी.ए.च्या तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित उपयोगी होईल असे मनोगत डॉ.सुरेश बोरोले यांनी व्यक्त केले. सदर पुस्तकात सुशासन निर्मितीची पार्श्वभूमी, सुशासनाची वैशिष्ट्ये व सुशासनासमोरील समोरील आव्हाने, व्यवस्थापनाचा अर्थ व उद्दिष्टे व्यवस्थापनाच्या कसोट्या, प्रशासकीय नेतृत्वाची वैशिष्ट्ये, प्रशासकीय नेतृत्वाची कार्य यासारख्या संकल्पनांची मांडणी साध्या व सोप्या भाषेत करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी देखील पुस्तक लेखनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आलेखात वाढ होते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.आर.पाटील यांनी केले. या कार्यक्रमात पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, मुख्याध्यापक व्ही आर पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील, नीता पाटील, रेखा पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ.संजय पाटील यांनी मानले. यावेळी त्यांनी पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य केल्याबद्दल अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी व त्यांची टीम यांचे विशेष आभार मानले.