उभ्या ट्रकवर भरधाव महिंद्रा कार आदळली ; ४ जणांचा जागीच मृत्यू, एकच जण आश्चर्यकारक बचावला
कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना क्रेनच्या मदतीने ट्रकमधून काढण्यात आले बाहेर
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (mahindra car accident) उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील ४ जण जागीच ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंपळकोठा इथंर हा अपघात बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडला. मृतांमध्ये ३जण जामडी तालुका चाळीसगाव येथील तर १ जण वडजी तालुका भडगाव येथील असल्याचे सांगण्यात आले. एम.एच.18 ए.ए.8867 या क्रमांकाचा ट्रक पिंपळकोठा प्रवासी बस थांब्यानजिक उभा असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच.19 सी.झेड 7360 या क्रमांकाच्या इंडीका कारने धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारचा यात चुराडा झाला. कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते. क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तीला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
या अपघातात कारमधील चतरसिंग पद्मसिंह परदेशी (चालक), विजयसिंग हरी परदेशी, जयदिप मदनसिंग परदेशी, आबा रामचंद्र पाटील (वडजी, भडगाव) हे जागीच ठार झाले तर त्यांचा सहकारी रायसिंग पदमसिंह राजपूत -(वय 37) हा दैव बलवत्तर होते म्हणून बालंबाल बचावला सदर इसम हा जामडी(चाळीसगाव) येथील पोलीस पाटील आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी झालेल्या भीषण अपघाताचा आवाज ऐकताच त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, या अपघातामुळे दोन्ही कडील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. पोलीस हेड काँन्स्टेबल काशिनाथ पाटील,अनिल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी वाहतूक सुरळीत केली.
मयत जयदीप हा एरंडोल येथील माजी मुख्याध्यापक एम.झेड परदेशी यांचा मुलगा असून तो एरंडोल ग्रामीण रूग्णालयात फार्मासीस्ट या पदावर कार्यरत होता. परदेशी यांचेसह इतर मृतांच्या नातेवाईकांनी एरंडोल ग्रामीण रूग्णालयात एकच आक्रोश केला.