ढगाळ वातावरणमुळे बळीराजा चिंतेत ; रब्बी पिके काढण्याची लगबग
बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, दादर ई पिके काढण्याची लगबग सद्या दिसून येत आहे. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यातच यंदा गव्हाचे क्षेत्र कमी असून गव्हाला यंदा २००० ते २६०० रू प्रती क्विंटल भाव असून दादर पिकाला ३००० ते ३४०० असा भाव आहे. त्यातच मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून दिवसाला २०० ते ३०० रू रोजंदारी मिळत आहे.
तसेच हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल यंदा दिसून आला आहे. मात्र इंधनाच्या दराचा हा शेती व्यवसायाला फटका बसत असताना दिसत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. पूर्वी मशागती साठी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने नागरटी सह अन्य शेतीची कामे करण्यात येत होती. आता मात्र पशुधन कमी झाल्याने शेतकरी ट्रॅक्टर ने मशागत करत असतो त्याला लागणारे इंधन म्हणजेच डिझेल ने शंभरी गाठली असल्याने आता भाडेही महाग झाले आहे. त्यामुळे एकरी २००० रू दराने नागरटी केली जात आहे. परिणामी शेती मशागतीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तसेच अल्पभूधारक शेतकरी हा भाड्याने ट्रॅक्टर मशागत करत असतो त्याला प्रामुख्याने ही अडचण येत आहे. तसेच ट्रॅक्टर व्यावसायिकांचे म्हणणे आहे की डिझेलच्या दरवाढीमुळे भाडे महाग झाले असल्याने त्याला तरी आम्ही काय करू? पुढेही अशीच दरवाढ सुरू राहिली तर भाडे अजूनही महाग होऊ शकते अस त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे शेती व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे. अल्पभूधारक तसेच कोरडवाहू शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. मात्र बोंडअळी पडल्याने अपेक्षित प्रमाणात उत्पादन मिळाले नाही.त्यामुळे रब्बी हंगामात बागायात दार शेतकऱ्याने हरभरा, गहू पिकाची लागवड केली तर कोरडवाहू शेतकऱ्याने दादर सारखे पीक लावणे पसंत केले. यंदा दादर सह गहू हरभरा पिकाला बऱ्यापैकी भाव असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान होते. पण ढगाळ वातावरण,इंधनाचे वाढते दर,शेती मशागतीसाठी लागणारा खर्च ई. सहन करत शेती व्यवसाय बळीराजा करत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बोरदसह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, दादर पीक काढण्याची लगबग दिसून येत आहे.