‘मराठी भाषेतील विनोद सर्वश्रेष्ठ’ : प्रा.डॉ.संजीव गिरासे
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने प्रा.डॉ.संजीव गिरासे (सुप्रसिद्ध कथाकथनकार व साहित्यिक, शिरपूर) यांचे ‘मराठीतील समृद्ध विनोद’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान व कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी ऑनलाईन उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही. टी.पाटील, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे तसेच सौ. एम.टी.शिंदे आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून देतांना उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के. एन. सोनवणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांमध्ये कथाकथनाची आवड निर्माण व्हावी तसेच या धावपळीच्या जीवनातून विनोदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव दूर व्हावा तसेच विनोदी साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी हीच कार्यक्रम आयोजनामागची भूमिका आहे.’
यावेळी प्रा. डॉ. संजीव गिरासे ‘मराठीतील समृद्ध विनोद’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान महत्वपूर्ण असते. तरुणांना आधार देऊन नव्या गोष्टी शिकविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करायला हवे. मनातील भावना व्यक्त करण्याचे भाषा हे प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषेतील विनोद सर्वश्रेष्ठ आहे. विनोद सादरीकरण करण्यासाठी वातावरणनिर्मिती करावी लागते. हसणे ही क्रिया दोन व्यक्तींमधील अंतर दूर करते. विनोद माणसं जोडण्याचे कार्य करतो.’ यावेळी त्यांनी त्यांच्या ‘दिल से’ या कथेचे कथाकथन करून रसिकांना खळखळून हसविले. रसिकांनी या कथाकथनाला भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी विनोदी साहित्याचा अभ्यास करून जीवनातील ताणतणावापासून दूर राहून स्वतःचे मानसिक आरोग्य जपायला हवे. या कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन डॉ. एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार एम.टी.शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाभरातून विविध महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच बहुसंख्य विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.