कोवीड-१९ मध्ये कर्तव्य बजावतांना मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसदारांना विमा कवच सानुग्रह सहाय्य अनुदान १ कोटी वाटप
धुळे : आज एकात्मिक बालविकास सेवासोजना प्रकल्प शिरपूर-१, पंचायत समिती शिरपूर अंतर्गत कोवीड- १९ संबधीत कर्तव्य बजावतांना ताराबाई उत्तम मराठे (ताराबाई जिजाबराव सनेर) अंगणवाडी सेविका बळकुवा-२ व भावना महेंद्र पटेल अंगणवाडी सेविका भरवाडे क्रमांक-३ या कोवीडमुळे मृत्यु झाल्या. ताराबाई उत्तम मराठे अंगणवाडी सेविका बळकुवा-२ त्यांच्या वारस वंदनाबाई संजय खैरनार व चेतना जिजाबराव सनेर यांना प्रत्येकी २५-२५ लाख रुपये लाभ देण्यात आला. तसेच भावना महेंद्र पटेल अंगणवाडी सेविका भरवाडे क्रमांक-३ यांचे वारस महेंद्र लिलाचंद पटेल व चि. गौरव महेंद्र पटेल यांना प्रत्येकी २५-२५ लाख रुपये लाभ देण्यात आला.
या जागतिक महामारिच्या संकटात कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या धुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशावर्कर्स, नर्स यांनी जनतेच्या तळागाळात शेवटच्या व्यक्तीपर्यंत महामारीत सर्वेक्षण करून जनजागृती केली हे काम करीत असताना या महिलांचा झालेला दुर्दवी मृत्यु झाला या कुटुंबाचा माता, भगिनी तसेच कुटुंबातील आधारवड गेल्याने खुप नुकसान झाले. हे नुकसान निव्वळ पैशांनी भरुन निघू शकत नाही. तरीही शासनातर्फे मिळालेल्या या अनुदानाचा त्यांच्या वारसांनी योग्य विनीयोग करावा व आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष साधावा असे आवाहन ना.डॉ. तुषार रंधे यांनी केले तसेच आम्ही सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे विकासरत्न अमरिशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वात या कठीण काळात आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकल्प अधिकारी शिंदे यांनी प्रस्तावनेत या प्रकरणाविषयी सखोल माहिती देत या निधीसाठी सतत दोन वर्ष पाठपुरावा केला. यासाठी धुळे जिप अध्यक्ष डॉ तुषार रंधे, महिला जि.प. बालकल्याण सभापती धरती देवरे यांनीही मंत्रालयातून निधी मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. वारसांच्या घरापर्यत जाऊन बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, शिरपूर तालुका कोशागार अधिकारी भुषण शांताराम सुर्यवंशी यांनी कागदपत्रांची पुर्तता करून घेतली व वारसांना अनुदान प्राप्त करून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
सदर लाभार्थ्यांना शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष भुपेश पटेल, धुळे जि.प.चे अध्यक्ष ना.डॉ. तुषार विश्वासराव रंधे, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम वेचान पावरा, महिला बालकल्याण सभापती धरती देवरे यांच्या हस्ते ऑनलाईन सी.एम.पी. प्रणालीव्दारे निधी देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तारसिंग नारखा पावरा, पंचायत समिती उपसभापती धनश्रीताई बोरसे, कारखाना उपाध्यक्ष दिलीप पटेल सामाजिक कार्यकर्ते भरत भिलाजी पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, शिरपूर तालुका कोशागार अधिकारी भुषण शांताराम सुर्यवंशी, दिलीप पटेल हे होते.