आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने ७ पाझर तलावांच्या दुरुस्तीस मान्यता ; गोताणे, काळखेडे, वजीरखेडे, मोघणचा समावेश
धुळे : धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने आणि पाठपुराव्यामुळे धुळे तालुक्यातील गोताणे काळखेडे, बजीरखेडे, मोघण येथील सात पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी १३ कोटी २० लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दरम्यान या कामामुळे पाणी पुरवठ चासह सिंचनाच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. धुळे तालुक्यातील सिंचनाच्या कामातून शेतकरी सुखी संपन्न व्हावा आणि जास्तीत जास्त शेती बागायती व्हावी म्हणून आ. कुणाल पाटील यांनी सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे.
त्याअनुषंगाने धुळे तालुक्यात साठवण बंधारे, पाझर तलावांची उंची वाढविणे, नामशेष झालेल्या पाट कालव्याचे पुर्नजीवन करणे, तसेच नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे आ. पाटील यांच्या प्रयत्नातून केले जात आहेत. दरम्यान अतिवृष्टीने क्षतिग्रस्त झालेले पाझर तलाव तसेच अनेक वर्ष जुने असलेल्या पाझर तलावांची वाढणारी गळती होऊन साठवण क्षमता कमी होते त्यामुळे अशा तलावांची साठवण व सिंचन क्षमता वाढावी म्हणून आ. कुणाल पाटील यांनी देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सर्व्हे करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जलसंधारण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार गोताणे,काळखेडा,बजिरखेडे, मोघण या गावांच्या शिवारातील नादुरुस्त व गळती वाढलेल्या पाझर तलावांचा सर्व्हे करुन जलसंधारण विभागाकडे पाठविण्यात आला. सदर कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून आ. कुणाल पाटील यांनी मृद व जलसंधारण मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे संबंधित गावातील ७ कामांना मुख्यमंत्री जलसंवर्धन योजन तगत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याच आ. कुणाल पाटील यांनी सांगितले असून त्याकरीता एकूण १३ कोटी २० लक्ष रुपयांचा निधीलाही मान्यता देण्यात आल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षांचा शेतकर्यांचा प्रलंबित प्रश्न सोडविल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आ. कुणाल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे धुळे तालुक्यातील पाझर तलावांची देखभाल व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यात पाझर तलाव दुरुस्ती गोताणे (निमदरा), पाझर तलाव दुरुस्ती वजीरखेडे (गाव नाला), पाझर तलाव दुरुस्ती गोताणे (मुंजळा धरण), पाझर तलाव दुरुस्ती गोताणे(ब्राम्हण दरा), पाझर तलाव दुरुस्ती काळखेडा (गोमुख नाला), पाझर तलाव दुरुस्ती गोताणे (नकटे खोसे), पाझर तलाव दुरुस्ती मोघन (गाव नाला) या कामांचा समावेश आहे. या पाझर तलावाच्या दुरुस्तीनंतर साठवण क्षमता वाढणार असून तलाव क्षेत्रातील शेकडो एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.



