खासदार इम्तियाज जलील यांना नितीन गडकरी यांनी दिले आश्वान ; पैठण व शिर्डी रस्ता सुध्दा लागणार मार्गी
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी आज रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवुन जालना रोडवर अखंड उड्डाणपूल, पैठण रस्ता आणि शिर्डीकडे जाणारा रस्त्याच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जालना रोड उड्डाणपूलाच्या डिपीआरच्या कामाला गती देऊन लवकरात लवकर अखंड उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासीत केले.
खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जालना रोडवरील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवुन नागरीकांना होणारा त्रास व येणाऱ्या अडीअडचणींची वस्तुस्थिती निदर्शनास आणुन दिली. खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीला नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता लवकरच जालना रोड वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यापूर्वी सुध्दा खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत अखंड उड्डाणपूलाची मागणी करुन संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्ली येथे वेळोवेळी भेट घेवून लवकरात लवकर पूलाच्या बांधकामास सुरवात करण्याची मागणी केली होती.
जालना रोडवरील अखंड उड्डाणपूल औरंगाबाद शहराच्या विकासाच्या दृष्टीने व लोकहिताचा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी सुरवातीपासूनच आक्रमक भुमिका घेत एनएचएआय विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठका घेवुन योग्य त्या सुचना केल्या होत्या. तसेच अखंड उड्डाणपूल व्हावे म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन सुध्दा सर्वोतोपरी सहकार्य व मदत करण्यास तयार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
आज केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चे दरम्यान भाविकांसाठी अत्यंत महत्पपूर्ण असलेल्या शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन पैठण रस्त्यासह औरंगाबाद जिल्ह्यात प्रलंबित व प्रस्तावित इतर महत्वपूर्ण प्रकल्पांविषयी चर्चा केली. प्रलंबित मागण्या व प्रस्तावांना लवकरात लवकर मार्गी लावून औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी बांधव, भाविक, व्यापारी व इतर नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
सध्या सुरु असलेल्या लोकसभा अधिवेनात खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय ज्वलंत असा ग्रामीण भागातील निकृष्ट दर्जाचे तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशी करावी आणि अनेक वर्षापासून रखडलेले प्रलंबित रस्ते त्वरीत पूर्ण करण्याची मागणी केली होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आणि केंद्रीय मार्ग निधीतुन औरंगाबाद जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची गुणवत्ता नियंत्रण समिती मार्फत दर्जा व गुणवत्ताबाबत तांत्रिक तपासणी करुन संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली. औरंगाबाद शहराला मेट्रो लाईनची गरज नसुन सद्यस्थितीत जालना रोड येथे नगर नाका ते चिकलठाणा अखंड उड्डाणपूल (फलायओवर) मंजुरी देण्यात यावी तसेच औरंगाबाद ते शिर्डी सुपरएक्सप्रेस तयार करणे, औरंगाबाद – सिल्लोड – अजिंठा महामार्ग काम त्वरीत पूर्ण करावे, औरंगाबाद पूणे एक्सप्रेसवे आणि कन्नड येथील औट्रम घाटचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली होती.