धुळे शहरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना चाळीसगाव पोलीसांनी अटक केली आहे. तसेच आरोपींकडून ४० इंच सोनी कंपनीची टी. व्ही, १० ग्रॅम सोन्याची पोत, २५०० रुपये रोख, गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा एकुण ६१,५०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी फिर्यादी रविंद्र बापुराव चौधरी (वय ४२ वर्ष व्यवसाय भाजीपाला विक्री रा. प्लॉट नं.०६, संताजी नगर हॉटेल चंडिकाचे पाठीमागे धुळे )यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०९ जानेवारी २०२२ रोजीचे सकाळी ०९.०० वा ते दिनांक १० जानेवारी २०२२ रोजीचे सकाळी ०८.३० वाचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे राहते घराचे कुलुप तोडुन घरातील सोनी कंपनीची ४० इंच टी. व्ही, १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व रोख रक्कम १०,००० रुपये असे एकुण २४,००० रु. किंमतीचे वस्तु व रोख रक्कम अज्ञात चोरटयांनी चोरी करुन नेले आहेत, असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात असतांना सपोनि पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा इम्रान चाटया (वय २२ वर्ष व्यवसाय मजुरी रा. अंबिका नगर, इब्राहीम मशिदसमोर धुळे) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केलेला आहे. त्याअनुषंगाने सपोनि पाटील यांनी पोउनि नितीन चौधरी व शोध पथकातील कर्मचारी यांना सदर ईसमांबाबत माहीती देवून त्यास ताब्यात घेवून पुढील तपास करण्याबाबत आदेशित केले. त्यावरुन पथकांने अंबिका नगर भागातुन इम्रान शेख रफिक ऊर्फ इम्रान चाटया यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सविस्तर विचारपुस केली असता त्यांने सदर गुन्हा त्याचे ईतर साथीदार हेमंत किरण मराठे (वय २६ वर्ष व्यवसाय मजुरी रा. वाहन मालक सोसायटी, हॉटेल डीडीआरसी मागे धुळे) व फरार एक साथीदार यांचे मदतीने केला असल्याचे सांगितले. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून ४० इंच सोनी कंपनीची टी. व्ही १० ग्रॅम सोन्याची पोत, २५०० रु रोख तसेच गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा एकुण ६१,५०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला असुन इम्रान शेख रफिक ऊर्फ इम्रान चाटया व हेमंत किरण मराठे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना बी एस डोईफोडे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग दिनकर पिंगळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील, पोउनि नितीन चौधरी, हेका पंकज चव्हाण, पोना एस.जी.कढरे, पोना बाळासाहेब डोईफोडे, पोकॉ हेमंत पवार, पोकॉ स्वप्नील सोनवणे, पोका चेतन झोलेकर, पोकॉ इंद्रजित वैराट, पोकों प्रशांत पाटील यांनी केली आहे.