निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : प्रा. अरुणभाई गुजराथी
चोपडा (विश्वास वाडे) तालुक्यातील चारही बाजूंच्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेनासे झाले आहे. सदर रस्त्यांवर मागील तीन महिन्यात तब्बल २६ निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर दीडशेच्या वर व्यक्ती गंभीर दुखापतीने त्रस्त आहेत आणि अधिकारी मात्र सुस्त आहेत अशा सुस्त व बेजबाबदार अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी उपोषणस्थळी बेजबाबदार अधिकाऱ्यांसमोर दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील रस्ते अतिशय खड्डेमय झाले आहेत. त्यांची दुरुस्ती व्हावी. खड्डे बुजवण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय दत्तात्रय पाटील तथा बाळासाहेब यांनी तहसिलदार अनिल गावित, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश पाटील व प्रमोद सुशिर यांना देण्यात आले होते. पण सार्वजनिक विभागाच्या अभियंत्यांनी सदर निवेदनास केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले. तरी दिनांक 3 डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद सदस्य विजय दत्तात्रय पाटील तथा बाळासाहेब यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वर्डी ते चोपडा १२ किलोमीटरची पायी दिंडी काढत चोपडा तहसील कार्यालयावर उपोषणास बसले. सदर उपोषणास दोन दिवस झाले तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल घेतली गेली नाही. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदर बाब विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर स्वतः प्रा. अरूणभाई गुजराथी उपोषणस्थळी पोहोचले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या व तसेच मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या भावना जाणून घेतल्या. उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश पाटील व प्रमोद सुशिर यांची प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी चांगलीच कानउघडणी केली. तालुक्यातील २६ लोक खराब रस्त्यांमुळे मृत्युमुखी पडले तोपर्यंत तुम्हाला जाग कशी आली नाही ? असा प्रश्न प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनुत्तरित झाले .
अधिकारी करताय ठेकेदारांची पाठराखण
वर्डी फाटा ते चोपडा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आधीच सात कोटीचे बिल अदा का व कसे करण्यात आले असा सवाल पिपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी सदर अधिकाऱ्यांनी केला. असता अधिकारी गणेश पाटील यांनी सदर ठेकेदारास नोटीस दिली असल्याचे सांगितले. दिलेली नोटीस दाखवा असे विचारले असता, त्यांना नोटीस दाखवता आली नाही तसेच सदर कामाचे ठेके तालुक्यातील लोकांना न देता सदर कामाचे ठेके जळगाव, धरणगाव व अमळनेर येथील ठेकेदाराला दिले जाते व काम पूर्ण होण्याच्या आधीच बिले अदा केली जात असल्याचे चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन गुजराती यांनी सांगितले.
२६ माणसे मेल्यावर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपयश म्हणावे लागेल. २६ माणसे मृत्युमुखी पडत असतील, अपघात ग्रस्त होत असतील तर ही चूक अक्षम्य आहे. सरकार जरी राष्ट्रवादीचे असेल तरी तरी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे मत प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केले. माझ्या ३५ ते ४० वर्षाच्या राजकारणात रस्त्यांची दुरवस्था पहिल्यांदा पाहतोय . अमळनेर येथील प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांसह इतर अधिकारी तालुक्यातील रस्त्यांना अक्षरशः कंटाळले आहेत तर मग सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सार्वजानिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची एकमुखी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गणेश पाटील यांना कालपासून उपोषणाची माहिती असताना देखील हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत सदर उपोषणा विषयी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले नाही तसेच ते चोपडा येथे कार्यालयात तीन दिवसांतून फक्त एकदाच येतात. त्याच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सलग ३५ वेळा त्यांच्या कार्यालयात भेटी दिल्या. तरी देखील गणेश पाटील कार्यालयात आढळून आलेले नाहीत तसेच त्यांच्या लॉक बुकची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे व अधिकारी गणेश पाटील यांच्यावर ३०२ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
उपोषण ठिकाणाहून प्रा. अरुण भाई गुजराथी यांनी उपोषण स्थळावरून चीफ इंजिनियर, रुपा गिरसे सी ई इत्यादी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले व तात्काळ रात्री चोपडा येण्याचे निर्देश दिलेत. अन्यथा स्थानिक अधिकाऱ्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करू असा इशारा देखील दिला. मला अधिकार्यापेक्षा कार्यकर्ता व तालुक्यातील निरपराध लोकांच्या गेलेलाबळी महत्त्वाचे आहे आणि तालुक्यातील निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रात्री उशिरा दहा वाजता अधीक्षक अभियंता रुपा गिरासे यांनी आठ दिवसात गड्डे बुजण्याचे आश्वासन देत उच्च स्तरीय कार्यकारी अभियंताची त्रयस्थ समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले. वर्क ओडर निघून चार महिने उलटून सुद्धा वेळेवर काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देत माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना उपोषण संपवण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देत रात्री अकरा वाजता बाळासाहेब पाटील यांनी उपोषण सोडले.
उपोषण स्थळी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, चोपडा सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, चोपडा पीपल बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, प्रवीण गुजराथी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ दामू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण शालिग्राम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर भानुदास पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विनायकराव चव्हाण, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शामसिंग परदेशी, पंचायत समितीचे माजी सभापती भरत पाटील, संजय कानडे, नगरपालिकेचे बांधकाम सभापती रमेश शिंदे, ज्येष्ठ उद्योजक नेमीचंद जैन, गिरीश आप्पा पाटील, प्रफुल्ल स्वामी, सनी सचदेव, प्रफुल्ल चौधरी ,शेखर पाटील, गोपाळराव सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत उपोषणस्थळी ठाण मांडून बसले होते.