सहकार भारतीचे कार्य म्हणजे समर्पित भावनेतून विकासाचे व्हिजन : नानाभाऊ माळी
नंदुरबार (प्रतिनिधी) सामाजिक जीवनात प्रत्येकाचे काम खारीच्या वाट्याप्रमाणे असते. मात्र ते कार्य समर्पित भावनेने सुरूच ठेवावे. सहकार भारतीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात उत्कृष्ट काम सुरू आहे. सहकार भारतीचे कार्य म्हणजे समर्पित भावनेतून विकासाचे व्हिजन आहे. असे प्रतिपादन नानाभाऊ माळी यांनी केले.
शहरातील देसाईपुरा भागातील दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहात मंगळवार दिनांक ११ जानेवारी रोजी सहकार भारतीतर्फे स्थापना दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शासन नियमावलीनुसार उपक्रम घेण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाळ नागरी सहकारी पतपेढीचे चेअरमन नानाभाऊ माळी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन मोहन चौधरी, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक, बँक प्रकोष्ठ प्रमुख बाळकृष्ण वाणी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त सहकार भारतीतर्फे सहकार क्षेत्रात दीर्घकाळापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यात दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव पांडुरंग माळी, सहसचिव सुदाम खैरनार, नवकार पतसंस्थेचे प्रल्हाद भावसार,म.ल. तांबोळी पतसंस्थेचे योगेश चव्हाण तसेच प्रसाद अर्थेकर दरबारसिंग सोलंकी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांनी केले. सुत्रसंचलन व आभार सहकार भारतीचे जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी मानले. स्थापनादिन कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलेश कासार, पुष्पेन्द्र कुंभार यांनी परिश्रम घेतले.


