तरुण पत्रकार संगपाल मोरे यास न्याय द्यावा ; पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
साक्री (प्रतिनिधी) येथील तरुण पत्रकार संगपाल मोरे याला शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. सदर अटक संदर्भात परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात असून सदर अटक संशयपूर्ण असल्याची चर्चा आहे. यामागे नेमके राजकारण आहे का ?, याविषयी पोलीस प्रशासनाने तटस्थपणे लवकरात लवकर योग्य तो तपास करावा व तरुण पत्रकार संगपाल मोरे यास न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील काही प्रमुख दैनिकांचे व टीव्ही चॅनेलचे संपादक जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार व विविध दैनिकांचे प्रतिनिधी यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांना देऊन निर्दोष पत्रकारांना याप्रकरणात अडकवू नये अशी विनंती केली आहे.
त्यानंतर सर्व पत्रकार प्रतिनिधी मंडळाने याप्रकरणी तपास अधिकारी म्हणून नियुक्त असलेले गुन्हा अन्वेषण चे प्रमुख शिवाजीराव बुधवंत यांच्याशीही याप्रकरणी सविस्तर चर्चा केली. उगाच स्थानिक राजकीय वादातून पत्रकार संघपाल मोरे याचे नाव याप्रकरणी गोवले गेल्याची शक्यता पत्रकारांनी याप्रकरणी व्यक्त केली. सर्व माध्यम प्रतिनिधींचा व पत्रकारांचा पोलीस प्रशासनावर विश्वास असून योग्य त्या दिशेने लवकरात लवकर तपास करून पत्रकारांवर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा सर्वांनीव्यक्त केली.
याप्रकरणी पोलीस प्रशासन योग्य त्या दिशेने तपास करेल फक्त पोलीस प्रशासनाला थोडा वेळ द्यावा. कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशा आश्वासन पोलीस अधीक्षक अनिलकुमार पाटील तपास अधिकारी शिवाजीराव बुधवंत यांनी पत्रकारांना दिले आहे. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व मी महाराष्ट्र चॅनलचे संपादक चंद्रशेखर पाटील, स्वराज न्यूज चॅनेल व साप्ताहिक स्वराज खानदेशच्या संपादक महेंद्रसिंग राजपूत, दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे आदी उपस्थित होते.
निवेदन देतेवेळी श्रमराज्यचे संपादक अतुल पाटील, टीव्ही9 चे विशाल ठाकूर, रवींद्रनाना इंगळे, पुरुषोत्तम गरुड, संतोष ताडे, नाना शिरसाठ, सुनील निकम, पवन मराठे, रवींद्र नगराळे, सोपान पाटील, सतीश पेंढारकर, प्रेस फोटोग्राफर गोरख गर्दे, विजय डोंगरे, संजय पाटील, राजेंद्र गुजराती, गोपाळ कापडणीस, राजेंद्र कापडणीस, अखिल भारतीय पत्रकार संघाचे जीवन शेंडगे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.