जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर
नंदुरबार (प्रतिनिधी) येथे जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही दिनांक 26 ते 27 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकाची रचना आयोजन समिती तर्फे जाहीर करण्यात आली.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे आयोजित राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा गेल्या 10 वर्षांपासून आयोजित केली जात आहे. मागील वर्षी कोरोना या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे सदर स्पर्धा स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सर्व निर्देशाचे पालन करीत दिनांक 26 व 27 फेब्रुवारी 2022 दरम्यान सदर जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या एकांकिकेस जिभाऊ करंडक सह 11 हजार रुपयाचा धनादेश व प्रशस्तिपत्र मिळतील. तसेच द्वितीय व तृतीय एकांकिकेस अनुक्रमे करंडकासह 7 हजार रुपये व 5 हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रके मिळतील. उत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका, लक्षवेधी एकांकिका व उत्तेजनार्थ एकांकिकेसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये, करंडक व प्रशस्तीपत्रके मिळतील. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष व स्त्री तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम साठी रोखे 2 हजार रुपये, द्वितीय साठी रोखे 1 हजार रुपये व तृतीय साठी रोखे पाचशे रुपये सह स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येतील. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट संगीत, लेखन, नेपथ्य, प्रकाश योजना यासाठी ही प्रत्येकी रोखे 2 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. तसेच सहभागी संघांना देखील सहभागाची प्रशस्तीपत्रके देण्यात येतील, असे आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी 2022 आहे.
या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी व महाविद्यालयांनी सहभागी होऊन नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीला चालना द्यावी असे आवाहन आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह तुषार ठाकरे, रवींद्र कुलकर्णी, राहुल खेडकर, पुरुषोत्तम विसपुते, सागर कदम, हर्षल महिरे, आदींनी केले आहे.