स्व.निखिल भाऊ खडसे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी
मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) रंगपंचमीच्या या रंगारंग कार्यक्रमात इयत्ता नर्सरी ते इयत्ता नववी च्या सर्व विद्यार्थ्यांनी व शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना विविध रंगीबेरंगी रंगांनी रंगुन रंगपंचमीचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा केला.
काही कारणास्तव शाळेच्या सेक्रेटरी रक्षाताई खडसे विदेश दौऱ्यावर असल्या कारणास्तव या अनोख्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु, दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांनी शालेय सर्व विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
होळी व रंगपंचमीचा सण म्हटला की, आपण आपल्या खऱ्या भारतीय महान संस्कृतीचा एक हिस्सा आहोत याची जाणीव प्रत्येकाला या क्षणी होत असते ज्या प्रमाणे सर्व रंग एकमेकात मिसळून आपले स्वतंत्र अस्तित्व सोडून रंगीबेरंगी विविधतेत मिसळून जातात त्याच प्रमाणे आपापसातील मतभेद, हेवेदावे, दुरावे व आधुनिक जीवनाचा ताण – तणाव विसरून आपण एकमेकांना जेव्हा विविध रंगांनी माखतो तेव्हा जीवनातील खऱ्या आनंदाची अनुभूती आपणास होत असते व सर्व आपण एकाच माळेचे मणी आहोत याची जाणीव आपणास होत असते असे आपले मनोगत या प्रसंगी शाळेचे प्राचार्य व्ही. के. वडस्कर यांनी विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शनपर व्यक्त केले. अशाप्रकारे सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हास्यमय वातावरणात हा रंगपंचमीचा रंगारंग कार्यक्रम सर्वांना विविध रंगात रंगून गेला.


