सोशल मीडियाच्या भूलभुलैयात ग्राहकांची फसवणूक थांबवावी…!
नंदुरबार (प्रतिनिधी) सध्याच्या आधुनिक युगात माहितीअभावी अनेकदा फसवणुकीच्या घटना घडतात. दिनांक 15 मार्च रोजी सर्वत्र जागतिक ग्राहक दिन साजरा होत असताना या विषयावर मंथन होणे आवश्यक आहे.
सोशल मीडियाच्या भूलभुलैयामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ लागली आहे. ग्राहकांनी जागरूक ग्राहक बनावे मात्र गिऱ्हाईक बनू नये. ग्राहकांनी कुठलीही वस्तू खरेदी करताना वस्तूचा दर्जा, उत्पादन वर रद्द होणारी तारिख बाबत सविस्तर तपासणी करून पक्के बिल विक्रेत्याकडून मागण्याचा आग्रह धरला पाहिजे. निकृष्ट दर्जाच्या मालामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होते. हल्ली ऑनलाईन खरेदी तसेच मॉलमधील वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. खरेदी केलेल्या वस्तू बाबत ग्राहक संरक्षण परिषद किंवा ग्राहक पंचायत यांच्याकडे तक्रार देण्यासाठी पुरावा असणे आवश्यक असते. ग्राहकांनी आपले हक्क आणि अधिकार समजून घेणे तितकेच आवश्यक आहे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत असून विक्रेत्यांकडून कधी खुल्या तर कधी छुप्या मार्गाने आक्रमण होते.
ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी सदैव जागरूक राहणे महत्त्वाचे ठरते. संभाव्य फसवणूक टळावी यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बाबत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, गृहिणी तसेच पुरेशा माहिती अभावी अनेक नागरिकांना काही नतद्रष्ट व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी फसवणुकीचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे खोटे आणि फसव्या मालाच्या आहारी न जाता नागरिकांनी सतर्कता बाळगून संभाव्य फसवणूक टाळावी. या विश्वात ग्राहक राजा आणि राणी दोघे महत्त्वाचे आहेत. हल्ली सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना त्या वस्तूंची खात्री करूनच खरेदी करावी अन्यथा त्वचा रोगासारखा आजाराला बळी पडावे लागते. अनेक बाबतीत ग्राहक अजूनही अनभिज्ञ आहेत. सेवा न घेतल्यास सुद्धा कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृहाचा वापर करू शकता. सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला चॉकलेट देऊ शकत नाही. चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांस नाही.
जाहिरातीमध्ये दिलेले वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवर ही दावा करू शकता. पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, गाडीच्या चाकात हवा, वैद्यकीय प्रथम उपचार पेटी, तक्रार करण्यास तक्रार वही किंवा तक्रार पेटी अशा सेवा ग्राहकां करिता पूर्णपणे मोफत असतात. अशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात अनेक सेवासुविधा ग्राहकांच्या हक्काचे असतात. याशिवाय बँकांच्या नावाने बनावट कॉल करून ग्राहकांच्या खात्यातून रक्कम हडप करण्याचे प्रयत्न देशभरातून सुरू आहेत. याला आळा घालण्यासाठी ग्राहकांनी सदैव जागृत राहणे गरजेचे आहे. जर रुग्णालयाने काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत. जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. नुकत्याच पारित झालेल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे अनेक ठिकाणी याबाबत वचक बसला आहे. शासनाचे खूप चांगले चांगले धोरण नागरिकांकरिता असतात. व ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. ज्यामुळे गरजू व्यक्ती वंचित राहतो. ग्राहकांची छोटी दुर्लक्षपणा सुद्धा कोणाच्या जीवावर बेतू शकते. तेव्हा ग्राहकांनी आपल्या हक्काला ओळखून जागरूक राहायला हवे तेव्हाच देशात भ्रष्टाचार, फसवेपणा थांबेल असे वाटते.