विद्यापीठसह महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करून जागतिक महिला दिन साजरा करा : सह संचालक डॉ. प्रा संतोष चव्हाण
जळगाव (नुरखान) येथील उच्च शिक्षण सह संचालक डॉ प्रा संतोष चव्हाण यांनी ८ मार्च जागतिक महिला दिन विद्यापीठ सह महाविद्यालय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्याचे आवाहन एका परिपत्रकाद्वारे केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली असून ज्याला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणुन घोषित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक व आर्थिक कामगिरीच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणारा दिवस आहे. जगभरातील लैंगिक असमानतेविरुध्द कारवाई करण्याच्या समर्थनार्थ महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यांसारख्या मुद्यांकडे लक्ष वेधून महिला हक्क चळवळीबाबतीत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर यावर्षी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस २०२२ मध्ये ७५ वर्ष पुर्ण होत असल्याने भारतीय संस्कृतीच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने १२ मार्च, २०२१ पासून ७५ आजादी का अमृतमहोत्सव हा उपक्रम देशभरात विविध पध्दतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.
या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये खालील कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे निधीतून करणेबाबत शासन परिपत्रकान्वये निर्देश दिलेले आहेत. विद्यापीठांमध्ये मुलींच्या स्वसंरक्षणासाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचे आयोजन करणे, महिला दिनाचे औचित्य साधून महिला सुरक्षाविषयक जाणीव जागृती निर्माण करणे व महिला सुरक्षा अभियान राबविणे,महिला दिनाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धन मोहीम राबविणे, माझी वसुंधरा कार्यक्रमाचे आयोजन करणे,कर्तृत्वसंपन्न व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या महिलांचे व तज्ञ व्याख्यात्यांचे व्याख्यान व परिसंवाद आयोजन करणे, महिला सुरक्षा / महिला सबलीकरण या विषयास केंद्रभूत मानून वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, भिंतीपत्र, पोष्टर, घोषवाक्य इ. उपक्रमांचे आयोजन करणे,उपरोल्लिखित उपक्रमांशिवाय महाविद्यालयांना इतरही पध्दतीने महिला दिन साजरा करता येईल. वरीलप्रमाणे दि.8 मार्च, 2022 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याबाबतचे परिपत्रक जळगाव सहसंचालक डॉ प्रा संतोष चव्हाण यांनी काढले असल्याचे कळविले आहे.