अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा : माजी आ.स्मिता वाघ
शेतकऱ्यांना अनुदान देण्याचीही मागणी, तहसीलदारांना निवेदन
अमळनेर (नुरखान) तालुक्यात दिनांक 7 आणि 8 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ.स्मिता वाघ यांनी केली आहे.
यासंदर्भात स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात अमळनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि 7 आणि 8 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील धार, मालपुर, अंबारे, तांदळी, अंतुर्ली, रंजाणे, पातोंडा, खौशी, मारवड, पिंपळे, गोवर्धन, कळमसरे, अटाळे, शिरसाळे, ढेकु, तळवाडे, मठगव्हाण, रुंधाटी तसेच इतर गांवातील गहू, मका, ज्वारी, हरभरा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा कोट्यावधीच्या घरात असल्याने शेतकऱ्यास प्रचंड आर्थिक फटका बसला आहे,यामुळे तातडीने पंचनामे होणे आवश्यक आहे.
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना केवळ शासकीय प्रस्ताव वेळेवर सादर न केल्यामुळे ते मदतीपासून वंचित राहून शासकीय अनुदान मिळाले नसल्याचे निदर्शनात आले आहे. सध्याचे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत तसा प्रकार न होता वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी दि 7 आणि 8 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे होवून नुकसान भरपाई मिळणेबाबत आपल्या स्तरावरील उचित आदेश त्वरित निर्गमित करण्यात यावेत अशी मागणी श्रीमती स्मिता उदय वाघ यांनी केली आहे.
यावेळी निवेदन देताना भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, जि.प. सदस्या मीनाताई पाटील, माजी सभापती प्रफुल्ल पवार, माजी सभापती श्याम आहिरे, माजी कृ.उ.बा समिती संचालक बंडू पाटील, सदाबापू पाटील, दगाजी पाटील, राकेश पाटील, रामलाल पाटील, रविंद्र देशमुख, भगवान पाटील, पंकज पाटील, कदामत खा. सोनू पाटील, जगदीश पाटील, जितेंद्र वाघ, राजेंद्र पाटील तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.