‘गुटखा किंग’ म्हणणाऱ्याला सुनिल शेट्टींनी सुनावलं ; ऑनलाइनच घेतली शाळा
मुंबई : तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीवरून काही दिवसांपूर्वीच मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्याच जाहिरातीसाठी एका नेटकऱ्याने अभिनेता सुनील शेट्टीला टॅग केलंय. मात्र यावेळी नेटकऱ्याने केलेल्या चुकीबद्दल सुनील शेट्टी यांनी त्याला चांगलंच सुनावलं. जाहिरातीत अजय देवगण ऐवजी त्याने सुनील शेट्टी यांना टॅग करत ‘गुटखा किंग’ असं म्हटलं. सुनील शेट्टी यांनी सुनावताच संबंधित नेटकऱ्याने माफी मागत तुमचा मोठा चाहता असल्याचं म्हटलं.
अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान असणाऱ्या तंबाखू ब्रँडच्या होर्डिंगचा फोटो शेअर करत एका युजरने या जाहिरांतींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना एकाने अजयऐवजी सुनील शेट्टीला टॅग केले आहे. हा फोटो शेअर करत एका ट्विटर युजरने असे म्हटले होते की, ‘हायवेवर इतक्या जाहिराती पाहिल्यानंतर आता मला गुटखा खावासा वाटत आहे.’ यावर कमेंट करताना दुसऱ्या एका युजरने असे लिहिले की, ‘अरे भारताचे गुटखा किंग शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी.. देशाचे चुकीच्या मार्गाने नेतृत्त्व करत आहात त्यामुळे तुमच्या मुलांना तुमची लाज वाटली पाहिजे. भारताला कर्करोगाच्या देशाकडे नेऊ नका.’
सुनील शेट्टीने जेव्हा हे ट्वीट पाहिले तेव्हा त्याने हात जोडण्याचे इमोजी पोस्ट करत असे म्हटले की, ‘भावा तू तुझा चष्मा नीट कर किंवा बदल’. सुनील शेट्टीच्या उत्तरानंतर या ट्विटर युजरने असे म्हटले आहे की, ‘नमस्कार सुनील शेट्टी. माफ करा हा टॅग चुकून झाला आहे. भाई माझा तुला दुखावण्याचा हेतू नव्हता, खूप सारं प्रेम. याठिकाणी अजय देवगण असायला हवा होता. मी तुझा खूप मोठा फॅन आहे त्यामुळे तुझं नाव टॅग्समध्ये सर्वात आधी येतं.’ अशाप्रकारे स्पष्टीकरण देत या युजरने सुनील शेट्टीची माफी मागितली आहे.