पंचसुत्रे डोळ्यासमोर ठेऊन झालेला समाधानकारक अर्थसंकल्प : आ.अनिल पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडी शासनाने कृषी, दळणवळण, ग्रामिण विकास, सिंचन आणि उद्योग ही पंचसूत्री डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प केल्याने निश्चितच हा दूरदृष्टीचा आणि समाधानकारक ठरणार आहे. अमळनेर मतदारसंघाच्या बाबतीत विचार केला तर सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प असून पाडळसरे धरणाला सलग दुसऱ्या वर्षी 100 कोटींपेक्षा जास्तीचा म्हणजे 110 कोटी निधी देऊन मोठा दिलासा दिला आहे.
विशेष म्हणजे अमळनेर मतदारसंघात एकूण 250 कोटी येणाऱ्या काळात प्राप्त होणार आहेत, यातुन धरण, शेतीशिवार रस्ते,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते, महसूल सोडून इतर प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी 11 कोटी 60 लाख, अत्याधुनिक ग्रामिण रुग्णालयाच्या इमारतीसाठी साडेसात कोटी, आणि 14 गावांना तलाठी कार्यालय इत्यादी कामे मार्गी लागणारे आहेत. यामुळे मतदारसंघातील जनतेसाठी समाधानकारक अर्थसंकल्प आहे. याशिवाय 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने तोही मोठा दिलासा आहे. दिलासादायक अर्थसंकल्प असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार,जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यासह महाविकास आघाडी शासनाचे आम्ही विशेष आभार मानत असल्याची प्रतिक्रिया आ अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.