छत्रपती शिवरायांसारखी संस्कारक्षम पिढी जन्माला यावी : वेदमूर्ती अविनाश जोशी
नंदुरबार (प्रतिनिधी) राष्ट्रमाता जिजाऊ यांनी नित्य लावण्य देवाचे स्वरूप दर्शन घेतले. सात्विक आहार घेतल्यामुळे संस्कारक्षम छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा राष्ट्रमाता जिजाऊंनी जन्माला घातला. गीता, भागवत, पारायणाचे नित्य नियममन करा. पाश्चात्य विकृतीचे अनुकरण न करता राष्ट्र संस्कृती जपून मांसाहाराचा त्याग करून सात्त्विक आहाराला प्राधान्य द्या. असे प्रतिपादन भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले.
तालुक्यातील रनाळे येथे माजी सरपंच रोहिदास नागरे यांच्या स्मरणार्थ नागरे परिवारातर्फे श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. बजरंग चौक मैदानावर आयोजित कथे प्रसंगी बोलताना अविनाश महाराज पुढे म्हणाले की, अध्यात्म लोप पावत चालले असून ज्ञानोबा तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे. प्रत्येकाने आपली वृत्ती डोळस ठेवा अंधश्रद्धा न बाळगता दीनदुबळ्यांची सेवा करा. भुकेल्यांना अन्न खाऊ घाला. संपूर्ण खान्देशात संत श्री दगडुजी महाराज यांनी दीनदुबळे वंचित आणि गरजूंना मदतीचा हात दिला. म्हणूनच पिढ्यानपिढ्या संत श्री दगा बापू यांचे सात्विक विचार समाजाला प्रेरणादायी ठरणार आहेत. अनेक वर्षानुवर्षांपासून नर्मदा परिक्रमेची आशा दिंडी पदयात्रा सुरूच आहे. हे केवळ त्यागी आणि श्रद्धाळू भाविकांच्या संघटन शक्तीमुळे आशा दिंडी पदयात्रेचे परंपरा कायम राहील असेही वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी सांगितले. कथेच्या चौथ्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान आज बुधवारी रुक्मिणीस्वयंवर सोहळा होणार आहे. तसेच उद्या गुरुवार दिनांक 17 मार्च रोजी श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता होईल. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. भागवत कथा श्रवणसाठी रनाळेसह पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली. कथा यशस्वीतेसाठी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती, संत दगा महाराज भक्त परिवार, जय भगवान बाबा महासंघ, श्री दादा गणेश मित्र मंडळ, नागरे परिवार आणि समस्त रनाळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.