टायर फुटून वाहन झाडाला आदळले ; कुटुंबातील चार जण गंभीर जखमी
बोरद (योगेश गोसावी) टायर फुटून वाहन झाडाला आदळल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तळोदा बोरद रस्त्यावर आमलाड गावापासून पुढे असलेल्या वळणाजवळ घडली. घटनेत वाहन झाडाला आदळल्याने वाहनाचा चक्काचूर झाला आहे. धवळीविहीर ता. तळोदा येथून तुळाजा येथे गृहप्रवेश कार्यक्रमात कुटुंब जात होते. दरम्यान जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तुळाजा येथील गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी धवळीविहीर येथील कुटुंब आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच ०३ सीबी ५९४३ तुळाजा येथे जात होते. आमलाड येथून पुढे मार्गस्थ होताना गावापासून पुढे असलेल्या वळणाजवळ वाहनाचे मागील चाकाचे टायर अचानक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या झाडाला वाहनाने जोरदार धडक दिली. यात वाहनातील प्रमिला स्वप्नील ठाकरे वय २१,शेवंती हेमंत ठाकरे वय ४५ , केसी महेंद्र ठाकरे ४२ ,महेंद्र रामा ठाकरे वय ४३ हे गंभीर जखमी झाले.
ही धडक इतकी जोरदार होती की वाहनाच्या पुढील भाग संपूर्ण चक्काचूर झाला होता. यावेळी नागरिकांनी तातडीने १०८ या क्रमांकावर दूरध्वनीद्वारे अपघात झाल्याचे कळविले. त्यावेळी अपघात झाल्याचे कळाले आहे ,गाडी पाठवीत आहोत असे उत्तर मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र तातडीने गाडी आलीच नाही. त्यावेळी रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रवीण वळवी यांनी तातडीने आपले खाजगी वाहन मागविले व त्या वाहनातून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे पोहोचविण्यात आले. त्यामुळे जखमींना वेळेवर उपचार करून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे घटनेत १०८ रुग्णवाहिकेची कमतरता व वेळखाऊपणा पुन्हा एकदा अनुभवास आला असल्याचे बोलले जात आहे.