लाच स्वीकारताना कातरवाडीतील ग्रामसेविकेला ‘एसीबी’ केली अटक
नाशिक (प्रतिनिधी) पिकांचे नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी गावातील इतर शेतकऱ्यांचे फॉर्म भरून देण्याच्या मोबदल्यात १ हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या चांदवड तालुक्यातील कातरवाडीतील ग्रामसेविकेला ९०० रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या पिकाचे नुकसान झालेले असून सदर पिकांचे नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडीतील ग्रामसेविका अनिता रामभाऊ कुटेमाटे (वय- ३४) यांनी तक्रारदार यांच्याकडून व गावातील इतर शेतकऱ्यांचे फॉर्म भरून देण्याचे मोबदल्यात एकूण १ हजाराची लाचेची मागणी केली व तक्रारदार यांनाच सदर लाचेची रक्कम शेतकऱ्यांकडून जमा करून आणून देण्यास सांगितले. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती. यानंतर ग्रामसेविका अनिता रामभाऊ कुटेमाटे यांनी १ हजाराची लाचेची मागणी करून ९०० रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. साधना इंगळे, पोहवा. सचिन गोसावी, पो.हवा.अशोक धामंदे, पोना राजेंद्र गिते या पथकाने केली.