प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ अडचणीत ; चित्रपटाविरोधात याचिका दाखल
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच कायदेशीर अडचणीत अडकल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. पण या ट्रेलरमध्ये एक दृश्य असं आहे ज्याचावर आक्षेप घेतला जातोय. याच दृश्यावरूनच दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात भ्रूणाचं लिंग परीक्षण करत असल्याचं एक दृश्य आहे. हे दृश्य ट्रेलरमध्येही दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर या दृश्यावर आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असं म्हणण्यात आलं की, ‘बाळाच्या जन्मआधी लिंग परीक्षण करणं हे कायद्याच्या दृष्टीकोनातून गुन्हा आहे. त्यामुळे चित्रपटातील हे दृश्य लोकांना अशाप्रकारचा गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतं त्यामुळे चित्रपटातून हे दृश्य काढून टाकण्यात यावं.’
कॉमेडी ड्रामा असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आपल्या जन्माला येणार असलेल्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री शालिनी पांडेय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणवीर आणि शालिनी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात बोमन ईरानी आणि रत्ना पाठक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन दिव्यांग टक्कर यांनी केलं आहे. यशराज बॅनरची निर्मिती असलेला हा चित्रपट १३ मे ला प्रदर्शित होणार आहे.