अमळनेर
मारवड भागातील मंडळ अधिकाऱ्याची बदली करा ; ग्रामस्थांची मागणी
अमळनेर (युवराज पाटील) तालुक्यातील मारवड भागातील मंडळ अधिकाऱ्याच्या गैरहजेरीला कंटाळून ग्रामस्थांनी त्यांची बदली करावी अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
मारवड भागाचे मंडळ अधिकारी दिलीप पुंजू पाटील हे मारवड येथील सजा कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून आले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांच्या नोंदी वेळेवर होत नाहीत. कुठल्याही शासकीय अर्जाचा निपटारा वेळेत होत नाही. तसेच ग्रामस्थांनी फोन केला असता फोन न उचलणे किंवा चुकीची माहिती देत दिशाभूल करणे अशी कामे ते करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ/ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून सदर मंडळ अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ बदली करावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.