कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीकडून क्लीनचीट ; कोर्टात ६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
मुंबई : कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. NCB ने आज, शुक्रवारी कोर्टामध्ये या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले. एनसीबीने कोर्टात दाखल केलेले हे दोषारोपपत्र ६ हजार पानांचे आहे.
आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्यातंर्गत एकूण १४ जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला आहे. तर उर्वरित सहा जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आले आहेत. एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान, मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी संजय कुमार यांनी दिली.
याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टाने मार्च अखेरीस दिलेली ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी आर्यनसह २० जणांना अटक झाली होती. आता एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव नाही. हा त्यासाठी मोठा दिलासा आहे. एकूण १० खंडाचे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेले आहे.