शिंदखेडा येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता ५वीच्या विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सव सोबत पालकांचे स्वागत सोहळा संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील एस. एम. एफ. एस. गर्ल्स हायस्कूलमध्ये दिनांक १५ जून रोजी इयत्ता ५वीच्या विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सव संपन्न झाला. विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील रमेश देसले, सचिव आनंदा चौधरी, संचालक माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित, एम.वाय. पवार, चंद्रशेखर चौधरी, दीपक देसले, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका एस. डी. ठाकूर उपस्थित होते.
इयत्ता ५ वीच्या विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना शाळेमध्ये प्रवेश देणे आणि त्यांना आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, म्हणूनच इयत्ता पहिलीत किंवा पाचवीत येणारे मूल रडत शाळेत न येता ते आनंदाने शाळेमध्ये आले पाहिजे. शाळेची त्याला गोडी वाटली पाहिजे. त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळेमध्ये यायला त्यांना आनंद वाटला पाहिजे. शाळा म्हणजे तुरुंग अशी भूमिका बदलायला हवी. शाळा म्हणजे आनंदी आनंद. जिथे मला नाचायला, खेळायला बागडायला भेटणार. जिथे माझे कौतुक होणार आणि म्हणूनच प्रवेश उत्सवाला असे स्वरूप देण्याचा प्रयत्न शाळेकडून केला गेला.
याप्रसंगी माजी प्राचार्य व संचालक. प्रदीप दीक्षित यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व व शालेय शिस्त विशद केले. तसेच एस. डी. ठाकूर यांनी विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो. त्यांच्याशिवाय शाळेत चैतन्य निर्माण होत नाही हे स्पष्ट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. पालकांचे देखील गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जे. पी. पाटील, पर्यवेक्षक के के. चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका एल. टी. थोरात व सर्व शिक्षक बंधुभगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. जगताप यांनी केले, प्रास्ताविक. व्ही. आर. वाघ यांनी सादर केले तर पी. पी. राजपूत यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.